Pune  :  सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी पुण्यात वेगळा ट्रस्ट व्हावा : चंद्रकांत पाटील

There should be a separate trust in Pune for the education of cleaners' daughters: Chandrakant Patil

एमपीसी न्यूज – स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी अनेक कायदे आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका यांचे अनुदान व योजना आहेत. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी  होत नाही. स्वच्छता कर्मचाऱ्यांची मुले चांगल्या पद्धतीने शिकली, तर त्यांची परिस्थिती सुधारेल. त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी पुण्यामध्ये वेगळा ट्रस्ट स्थापना व्हावा, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

पुणे महापालिका  स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने मित्र परिवारतर्फे मोदी सरकारच्या दुस-या सत्रातील वर्षपूर्तीनिमित्त नारायण पेठेतील गोगटे प्रशालेच्या प्रांगणातून शहराच्या मध्यवस्तीत काम करणा-या पुणे महापालिकेच्या सफाई कर्मचा-यांचा स्वच्छता सुरक्षा किट देऊन गौरव करण्यात आला.  त्यावेळी ते बोलत होते.

शहरातील सुमारे 1  हजार 500 जणांना टप्याटप्याने हे स्वच्छता सुरक्षा किट देण्यात येणार आहेत.

यावेळी हेमंत रासने, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, नगरसेवक राजेश येनपुरे, अ‍ॅड.गायत्री खडके, अजय खेडेकर, प्रमोद कोंढरे, उदय लेले आदी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, कोल्हापूरामध्ये आम्ही संवेदना ट्रस्टच्या माध्यमातून कष्टक-यांच्या 300 मुलींचे शिक्षण करीत आहोत.

आमचा प्रयत्न 3  हजार मुलींना शिक्षण देणे, असा आहे. कष्टक-यांच्या मुली शिकल्या, तर कुटुंब अधिक सक्षम होतील.

त्यामुळे त्यांची जबाबदारी आपण घ्यायला हवी. पुणेकरांच्या आरोग्यासाठी झटणारी ही कष्टकरी मंडळी आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्य व कुटुंबाला सक्षम करण्याकरीता आपण पुढे यावे, असे आवाहन पाटील यांनी केले.

हेमंत रासने म्हणाले, महात्मा गांधी यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला स्वच्छतेचा मंत्र दिला. त्यामुळे जे स्वच्छता कर्मचारी शहराची व देशाची साफसफाई करतात, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

त्यामुळेच आम्ही 1  हजार 500  स्वच्छता कर्मचा-यांना स्वच्छता सुरक्षा किट देत आहोत. मास्क, हँडग्लोव्हज्, सॅनिटायजर आदी साहित्यासह ताप मोजण्याकरीता डिजिटल थर्मामीटर देखील किटमध्ये आहेत.

त्यांच्या आरोग्याच्या काळजीप्रमाणेच कर्मचा-यांच्या मुलांचे शिक्षण उत्तमरितीने व्हावे, याकरीता देखील वेगळे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.