Pune : …अन् ऑनलाईन नातेवाईकांच्या साथीने त्यांनी पुण्यात बांधली लग्नगाठ (व्हिडीओ)

एमपीसी न्यूज – इचलकरंजी येथील नव-या मुलीच्या घरी पुरोहित बोलवण्यात आला. नवरदेवाचे आई-वडील कटक शहरातून ऑनलाईन आले. पुण्यातून नवरदेव आणि नवरी मुलगी ऑनलाईन आले. दोन्ही घरातील सर्व नातेवाईक इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन आले. पुरोहितांनी लग्नाचा शास्त्रोक्त विधी सुरु केला. त्यांनी म्हटलेल्या मंत्रोच्चाराबरोबर वधू प्रीती दास (ओझा) आणि वर निहार दास यांनी ‘ऑनलाईन’ नातेवाईकांच्या साथीने सात फेरे घेतले आणि लग्नाची रेशीमगाठ बांधली.

मूळ ओडिसाच्या कटकचा रहिवासी असणारा निहार दास नोकरी निमित्त पुण्यात राहतो तर प्रीती दास सुद्धा नोकरी निमित्त पुण्यातच राहते. ती इचलकरंजी येथील रहिवासी आहे. दोघांचा विवाह काही कारणानिमित्त दोन वेळा पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर लग्नासाठी 26 एप्रिलचा मुहूर्त ठरवण्यात आला होता. पण, कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. जमावबंदी आणि संचारबंदी कडक करण्यात आली. दोनवेळा पुढे ढकलण्यात आलेले लग्न येणाऱ्या मुहूर्तावर करायचे या विचाराने दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने ऑनलाइन पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कुटुंब सदस्यांनी रितसर पोलिसांची परवानगी घेऊन रविवारी (दि.26) दुपारी बारा वाजता विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नवरदेव निहार दास याचे आई-वडील व नातेवाईक ओडिसाच्या कटक शहरातून तर प्रीती दास हिचे आई-वडील व नातेवाईक कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथून आणि निहार दास आणि प्रीती दास पुण्यात ऑनलाईन एकत्र आले व विवाह विधीला सुरवात झाली. शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रोच्चारांच्या साथीने सर्व सोहळा विधीवत पार पडला. पती-पत्नी निहार आणि प्रीती दास यांनी सर्व नातेवाईकांचे ऑनलाईन आशीर्वाद घेऊन नवीन आयुष्याला सुरुवात केली.

निहार दास बँक कर्मचारी असून एरिया सेल्स मॅनेजर या पदावर काम करतात. तर जर्मनीमध्ये उच्च शिक्षण घेतलेली प्रीती दास पुण्यातील एका खासगी कंपनीत काम करते. दोन्ही कुटुंबांनीही कुठेही गर्दी होणार नाही याची काळजी घेतली होती. तसेच सामाजिक भान जपत व आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून समाजाला चांगला संदेश दिला आहे. पोलीस प्रशासनाकडून सुद्धा त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

कोरोनासारख्या भयानक आजाराचे बाहेर थैमान सुरू असताना आपण प्रशासनाला योग्य सहकार्य केले पाहिजे तसेच सामाजिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विवाह सारख्या गोष्टीवर मार्ग काढता येतो अशी भावना नवविवाहीत जोडप्याने यानिमित्ताने व्यक्त केली आहे.

इचलकरंजी येथील मुलीच्या घरी  विवाह काही विधी करण्यात आले .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.