Pune : गणपती विसर्जनाला गेले अन् घर पेटले; अग्निशमन दलाच्या चालकामुळे टळला मोठा अनर्थ

एमपीसी न्यूज – गुरुवारी गणपती विसर्जनाची धामधुम सुरु असताना पुणे शहरात एक आगीची दुर्घटना घडली खरी. पण, अग्निशमन दलाचे वाहनचालक सतीश शंकर जगताप यांनी दाखविलेल्या कर्तव्य तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना हडपसर, भेकराई नगर, ढोरेवस्ती येथे गुरुवारी चारच्या सुमारास गणरायाच्या विसर्जनावेळी घडली.

विसर्जनाच्या दिवशी गणरायांना निरोप देण्याची तयारी पुर्ण करुन जगताप यांच्या घराशेजारी राहणारे कुटूंब बाप्पांचा जयघोष करीत विसर्जन करण्याकरिता सर्व कुटूंबासमवेत घराबाहेर पडले. त्यानंतर काही वेळातच घरातून धूर येत असल्याचे स्थानिकांनी पाहिले व लगेच अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षास व तिथेच राहणारे दलाचे चालक जगताप यांना दुरध्वनी केला. त्याचवेळी जगताप हे तिथेच जवळपास असल्याने त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

तिथे पोहोचताच त्यांनी कुलूप तोडत घरात प्रवेश केला तर घरगुती उपकरणांनी पेट घेतल्याचे त्यांना दिसले. त्यांनी प्रथम स्वयंपाक घरातील दोन सिलेंडर बाहेर काढले. बादलीच्या साह्याने पाणी मारुन आग पसरु न देता पुर्णपणे विझवली. अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षास तशी माहितीही दिली. जगताप यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे आग इतरत्र पसरली नाही व सिलेंडर वेळीच बाहेर काढल्याने अनर्थ टळला.

विद्युत वाहिनीत काही बिघाड झाल्याने आग लागली असावी, असा अंदाज वर्तवला आहे. या आगीत घरातील सोफासेट, टेबल, वायरिंग वैगेरे जळाल्याचे जगताप यांनी सांगितले. तसेच स्थानिक शंभु धायगुडे व इतरांनी खूप सहकार्य केले, असे ही ते म्हणाले. यावेळी संबंधित कुटूंब आणि स्थानिकांनी जगताप यांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.