Pune: पोलिसांच्या वेशात आलेल्या चोरट्यांनी गोळीबार करत सराफा दुकान लुटले

Pune: Thieves in police uniform opened fire and looted a jewellery shop कापूरहोळ परिसरात बालाजी ज्वेलर्स हे सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे.

एमपीसी न्यूज- पुणे-सातारा रस्त्यावरील कापूरहोळ गावातील बाजारपेठेत पोलिसांच्या वेशात आलेल्या चोरट्यांनी गोळीबार करत एका ज्वेलर्सच्या दुकानातून सोन्याचे दागिने लुटल्याची खळबळजनक घटना घडली. हा थरार गुरुवारी (दि.6) सायंकाळी घडला. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरु आहे. सुदैवाने गोळीबारात कोणी जखमी झालेले नाही. खेड शिवापूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कापूरहोळ परिसरात बालाजी ज्वेलर्स हे सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पोलिसांच्या वेशात आलेल्या चोरट्यांनी दुकानाचा मालक आणि कर्मचाऱ्यांवर पिस्तूल रोखून दागिन्यांची मागणी केली.

कर्मचाऱ्याने दागिने देण्यास नकार दिल्यानंतर चोरट्यांनी गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. त्याचदरम्यान चोरट्यांनी दुकानातील दागिने लुटून पलायन केले.

पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. चोरट्यांनी नेमका किती ऐवज लुटला, याबाबतची माहिती रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.