Pune: दिवसात तिसऱ्या कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद, शहरातील पाचवा बळी!

एमपीसी न्यूज – पुण्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा पाचवर पोहोचला आहे. आज सकाळी औंध रुग्णालयात एका 69 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. एका दिवसात नोंद झालेला हा कोरोनाचा तिसरा बळी आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

पित्ताशयाचा त्रास होत असल्यामुळे या महिलेला गुलटेकडी येथील अडव्हेंटिस्ट हॉस्पिटलमध्ये 30 मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. त्याच रात्री तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला, तिला पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालयात पाठविण्यात आले. परंतु या रुग्णालयात जागा नसल्याने उपचार न करता तिला औंध येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळी उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

पुण्यात ससून रुग्णालयात आज सकाळी दोन मृत रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात औंध रुग्णालयातील महिलेच्या मृत्यू झाल्याने दिवसभरात तिसऱ्या कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झाली. यापूर्वी दोन केरोनाबाधितांचा शहरात मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना बळींची एकूण संख्या पाच झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.