Pune : लॉकडाऊनचा तिसरा टप्पा; पुणेकरांचा दिवस संभ्रमातच गेला

एमपीसी न्यूज : लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यातील पहिला दिवस शासकीय अधिकाऱ्यांच्या विसंगत परिपत्रकांमुळे संभ्रमातच गेला. लॉक डाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात आज बाजारपेठांत गोंधळाचे वातावरण होते. धान्य, दूध आणि औषध या जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळात खुली होती. मात्र, रविवारी दुकानांच्या वेळांबाबत म्हणजे सकाळी दहा ते दुपारी दोन की सकाळी दहा ते संध्याकाळी सहा याबाबत वेगवेगळी परिपत्रके निघाली आणि संभ्रम चालू राहिला.

जीवनावश्यक वस्तू सोडता अन्य कोणती दुकाने चालू राहाणार यातही स्पष्टता नव्हती. गल्लीमध्ये पाच दुकाने चालू राहातील असे पालिका आयुक्तांनी सांगितले पण, कोणती पाच दुकाने याचा उलगडा व्यापाऱ्यांना झाला नाही. दुकाने उघडण्यासाठी तरी व्यापाऱ्याने कर्फ्यूच्या काळात कसे जायचे याबाबत स्पष्टता नव्हती. पोलीस अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत याबाबत खुलासा केला नाही. व्यापारी वर्ग पूर्णपणे गोंधळून गेला होता.

प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून विसंगत परिपत्रके काढण्याचा गोंधळ चालू होता. यामध्ये पालकमंत्री अजित पवार यांनी हस्तक्षेप करुन संभ्रम दूर का केला नाही याबद्दल लोकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले. मद्य विक्रीच्या दुकानांबाबत लोकांमध्येही खूपच उत्सुकता होती. पुणे शहरात मद्य विक्रीची दुकाने चालू राहातील असा एक आदेश निघाला. त्यानंतर काही तासांनी ही दुकाने बंद राहातील असा दुसरा आदेश निघाला. तरीही, मद्यप्रेमींनी सकाळीच दुकानांसमोर रांगा लावल्या. प्रत्यक्षात मद्यविक्रीची दुकाने उघडलीच नाहीत त्यामुळे मद्यप्रेमी निराश झाले. काही ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी पोलीसांनी छडीमार केला.

या संभ्रमातच आजचे व्यवहार चालू राहिले. कोथरूड, वारजे वगैरेंची भागात पोलीसांनी दमदाटी करून दुपारी १२ वाजताच दुकाने बंद करायला लावल्याच्या तक्रारी दुकानदारांनी केल्या. सोमवार पेठ, मंगळवार पेठ आणि रास्तापेठेत भाजी विक्रेत्यांचा माल महापालिका अधिकाऱ्यांनी जप्त केला अशा तक्रारी आल्या.

शहरातील व्यवहार सकाळी दहा ते संध्याकाळी सहा ता वेळात चालू ठेवण्यास प्रशासनाची तयारी आहे. पण, महापौर मुरली मोहोळ यांचा या वेळेला विरोध आहे. या परस्पर विरोधी गोष्टींमुळेही पुन्हा संभ्रम झाला आहे. एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तर दुसरीकडे प्रशासन निर्बंध उठवत आहे. त्यातही एकवाक्यता नाही. त्यामुळे उद्या (मंगळवारी) नेमकी काय सुरू आणि काय बंद हे निश्चित नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.