Sushant Singh Rajput Case: मुंबई पोलिसांच्या मदतीनेही या प्रकरणाचा तपास करता येईल – रोहित पवार

पार्थ पवारांची सीबीआय चौकशीची मागणी योग्यच पण मुंबई पोलिसांच्या मदतीने ही या प्रकरणाचा तपास करता येईल - रोहित पवार

एमपीसी न्यूज – सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत करण्याची पार्थ पवार यांची मागणी अतिशय योग्य होती. याप्रकरणी त्यांनी जी काही मागणी केली त्याच मताचा मीही आहे, पण मला असं वाटतं की, महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलिसांच्या मदतीने सुद्धा या प्रकरणाचा तपास करता येईल, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी एकप्रकारे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यास असहमती दर्शवली.

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी केली होती. त्यावर विचारले असता रोहित पवार यांनी उत्तर दिले.

रोहित पवार म्हणाले पार्थ पवार, माझं आणि इतर लोकांचे म्हणणं एकच आहे की सुशांत सिंग यांच्यावर जर अन्याय झाला असेल तर आणि तो कुणा बाहेरच्या व्यक्तीने केला असेल तर ती केस लवकरात लवकर मार्गी लागली पाहिजे. आत्महत्येसाठी जी कोणी व्यक्ती जबाबदार असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे.

ज्या चित्रपटश्रुष्टीतील सुशांत सिंग मोठे कलाकार होते त्याच चित्रपटसृष्टीतील स्पॉटबॉयपासून ते इतरही अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. आरोग्य विभागात काम करणारे, व्यावसायिक, शेतकरी यांनीही आत्महत्या केल्या आहेत पण त्याबद्दल कोणीच बोलताना दिसत नाही.

आजच्या परिस्थितीत अनेक लोकं अडचणीत आहेत. या लोकांसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून काहीतरी करण्याची गरज असल्याचे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.