Pune : राजकारण करण्याची ही वेळ नाही : वंदना चव्हाण यांचे भाजपाला खडे बोल

एमपीसी न्यूज – खासदार गिरीश बापट व भाजपा शहराध्यक्ष योगेश मुळीक यांनी नुकतीच पालकमंत्री अजितदादा पवार यांच्यावर टिका केली आहे. तसेच त्यांच्या पक्षातील इतर वरिष्ठ पदाधिकारी देखील बेजबाबदार विधाने करीत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या आपत्तीतही भाजपाला नागरिकांच्या आरोग्यापेक्षा राजकारणात अधिक रस असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या या संकट काळात राजकारण करण्याची ही वेळ नाही, आशा शब्दांत राज्यसभेच्या खासदार ऍड. वंदना चव्हाण यांनी भाजपला सुनावले.

वास्तविक महापौर मुरलीधर मोहोळ हे स्वत:च महापालिका आयुक्तांच्या कार्यपध्दतीचे कौतुक करीत होते, तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे इतर पदाधिकारी व महापालिकेतील गटनेते यांना न जुमानता श्रेय केवळ स्वत:ला लाटण्यासाठीच अधिक धडपड करत होते.

मग अचानक असे नेमके काय झाले की,त्यांना आता प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करावे लागत आहे ?, असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

महापौर या नात्याने त्यांनी प्रशासन, महापालिकेतील सर्व पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक,शहरातील आमदार आणि खासदार व तसेच या महामारीच्या वेळेस मार्गदर्शन करू शकणाऱ्या प्रतिष्ठित नागरिक यांच्याशी समन्वय घडवून महापौर म्हणून आपली जबाबदारी पार पाडणे अपेक्षित होते. परंतु, तसे घडले नाही.

आंदोलनाचा इशारा देणारे आणि पालकमंत्री अजितदादा पवार यांना निशाणा करणारे शहरातील भाजपचे खासदार गिरीश बापट गेल्या ५५ दिवसांपासून कोठे होते? असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत.

कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण कसबा, कॅंन्टोंनमेंट आणि पर्वती विधानसभा मतदारसंघात आहेत. परंतु, तेथील आमदार हे निष्क्रीय असल्याचे अनेक घटनांतून दिसून आले आहे.

शहरातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात यावी म्हणून पालकमंत्री पवार यांनी गेल्या दोन महिन्यांत पुण्यात सात बैठका घेतल्या. महापालिकेला मदतीसाठी चार IAS अधिकारी नेमले.

कोरोनासाठी वैद्यकीय साधने, उपकरणांसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. ससून हॉस्पिटलला अतिरिक्त ५५ कोटी रूपयांचा निधी देवून तिथे तातडीने कोव्हिड हॉस्पिटल उभे केले, असेही वंदना चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.