Pune : गणेशोत्सवाची वर्गणी न दिल्याने पोलिसांकडून कारवाई करायला लावण्याची रिक्षाचालकाला धमकी

एमपीसी न्यूज – गणेशोत्सवाची जबरदस्तीने धमकावून वर्गणी मागितली. वर्गणी देण्यासाठी रिक्षाचालकाने नकार दिला असता त्याच्या रिक्षावर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करायला लावण्याची धमकी दिली. ही घटना विश्रांतवाडी येथील मच्छीमार्केट जवळ सोमवारी (दि. 2) सकाळी घडली.

प्रमोद विक्रम शेलार (वय 39, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुंदन लष्करे (रा. विश्रांतवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद हे सहा आसनी रिक्षा भोसरी-विश्रांतवाडी या मार्गावर चालवण्याचे काम करतात. सोमवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास त्यांनी त्यांची रिक्षा विश्रांतवाडी येथील मच्छी मार्केट येथे नंबरला लावली. दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या रिक्षाचा नंबर आला. ते प्रवाशांना घेऊन जात असताना आरोपी कुंदन त्यांच्या रिक्षाजवळ आला. त्याने प्रमोद यांना गणपतीची 1 हजार रुपये वर्गणी मागितली. प्रमोद यांनी आता आपल्याकडे पैसे नाहीत. वर्गणीचे पैसे संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी देण्याचे सांगितले. त्यावर कुंदन याने आता वर्गणीचे पैसे नसतील तर गाडी भरायची नाही. तुझ्या गाडीवर वाहतूक पोलिसांना कारवाई करण्यास सांगतो. इथून गाडी काढ नाहीतर गाडी फोडून टाकेल, अशी धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून विश्रांतवाडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.