Pune : ससूनमध्ये 11 वर्षीय चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू ; एकूण मृतांचा आकडा 77

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील कोरोना बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काल ( सोमवारी) वारजे माळवाडी येथील 11 वर्षीय चिमुकल्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याचबरोबर 31  वर्षीय तरुणासह 63  वर्षीय जेष्ठाचाही काल  रात्री मृत्यू झाला.  त्यामुळे एकट्या ससूनमधील कोरोनाबळींची संख्या 77  वर जाऊन पोहचली आहे.

ससून आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. या तिघांचाही मृत्यू सोमवारी ( दि.4)  मेडिकल बुलेटिन जाहीर झाल्यानंतर झाले आहेत.   मृतांपैकी 11 वर्षीय मुलगा वारजे माळवाडी येथे वास्तव्यास होता. 3  मे रोजी त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. याच दिवशी त्याचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर दुसऱ्याचा दिवशी सोमवारी ( दि. 4) त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, कोरोनासह त्याला इतरही आजार होते.

येरवडा येथील 31  वर्षीय तरुणाला 1  मे ला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आला होता. 4  मे रोजी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या रुग्णालाही अन्य आजार होते.

तर भवानी पेठेतील 63  वर्षीय जेष्ठाला 24  एप्रिलला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. याच दिवशी त्यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. काल ( दि. 4) रात्री सव्वा दहा वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकट्या ससूनमधीलकोरोनाबळींची संख्या 77  वर जाऊन पोहचली आहे.

यापूर्वी ससूनमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये इतरही गंभीर आजार होते, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.