Pune: संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेत तीन जम्बो रुग्णालये तातडीने उभारावीत, अजित पवार यांचे निर्देश

Pune: three jumbo hospitals should be set up immediately for corona patient, says deputy cm Ajit Pawar खासगी रुग्णालयाचे बिल स्वतंत्र लेखा परीक्षकांच्या माध्यमातून तपासली जातील.

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हयातील ‘कोरोना’ बाधित संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेवून तातडीने तीन ठिकाणी जम्बो रुग्णालयांची उभारणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज (दि.27) दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.

अजित पवार म्हणाले, कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याबाबतची दक्षता घ्यावी लागणार आहे. पुणे शहरासह जिल्हयातील ऑगस्ट अखेरची स्थिती विचारात घेत गतीने नियोजन करावे लागणार आहे.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजना सोबतच आरोग्य विषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वेतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगतानाच कोरोना प्रतिबंधक तातडीच्या उपाययोजनांसाठी तसेच मंत्रालयस्तरावरील प्रश्न तातडीने मार्गी लावणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, खासगी दवाखान्यातून कोरोना उपचाराची मोठ्या रक्कमांची बिले आकारली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. खासगी रुग्णालयाचे बिल स्वतंत्र लेखा परीक्षकांच्या माध्यमातून तपासली जातील.

शासनाच्या नियमानुसार उपचारांची दर आकारणी केली आहे का, याची शहानिशा करूनच रुग्णाला बिल दिले जावे, याबाबत सबंधित यंत्रणेने दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचनाही पवार यांनी दिल्या.

प्रारंभी विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठीच्या सुविधा उभारणीबाबतचे प्रशासकीय पातळीवरील नियोजन गतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांनी कोरोना उपचार व्यवस्थेबाबत तसेच उपलब्ध आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळ तसेच संभाव्य स्थिती विचारात घेत करण्यात येत असलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. कोरोना संसर्ग रोखण्यासोबतच पुणे शहरासोबतच ग्रामीण भागात आरोग्य सुविधा अद्ययावत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार व पिंपरी-चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकाक्षेत्रात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.

बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम,  पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, सहकार आयुक्त अनिल कवडे, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनु गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, शासनाचे वैद्यकीय सल्लागार डॉ. सुभाष साळुंके, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.