Pune : वेतन न मिळाल्याने ‘पीएमपी’च्या रोजंदारी सेवकांवर उपासमारीची वेळ

Time of starvation on salaried employees of 'PMP' due to non-receipt of salary

एमपीसी न्यूज – ‘पीएमपीएमएल’च्या रोजंदारीवर काम करणाऱ्या 2 हजार 169 कामगारांना पगार मिळालेला नाही. यामध्ये कंड्क्टर, ड्रायव्हर, वर्कशॉपमध्ये काम करणारे सेवक यांचा समावेश आहे. त्यामुळे रोजंदारी पदावरील सेवकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

रोजंदारीवर काम करणारे काही सेवक हे भाड्याच्या घरात राहतात. या सेवकांचा पगार प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेस होतो. परंतु, एप्रिल २०२० या कालावधीतील पगार अद्यापही अदा करण्यात आलेला नाही. पगार न झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

रोजंदारी सेवकांचा पगार देण्यास ‘पीएमपीएमएल’कडे फंड उपलब्ध नाही. परंतु, पुणे महानगरपालिकेकडून वेतन देण्याचा हिस्सा पीएमपीएमएल प्रशासनाकडे जमा करण्यात आला असूनही सेवकांना वेतन दिले जात नाही, ही गंभीर बाब असल्याचे विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी सांगितले.

याउलट पीएमपीएमएल प्रशासनाने सेवकांना वेतन न देता इतर ठेकेदार व कंपन्यांचे बिल व वेतन अदा केले आहे.

महाराष्ट्र शासन उद्योग उर्जा व कामगार विभाग यांच्याकडून कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशानुसार घरी राहावे लागत असले तरी ते कर्मचारी कामावर आहेत, असे समजून त्यांना वेतन व भत्ते अदा करण्यात यावे, असा शासनाचा आदेश आहे.

त्यामुळे तातडीने पावले उचलून रोजंदारी पदावरील सेवकांना तातडीने पगार अदा करण्यात यावा, असे पत्र पीएमपीएमएल प्रशासनास देण्यांत आले आहे. सद्यस्थितीत कोरोनामुळे संपुर्ण भारतात संचारबंदी लागु करण्यात आली आहे. पुणे शहरात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे.

परिणामी सगळीकडे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाच्या निर्णयाप्रमाणे पीएमपीएमएलमधील कायम व रोजंदारी पदावरील सेवकांना मार्च २०२० या कालावधीतील पगार अदा करण्यात आलेला होता.

वास्तविक प्रत्येक महिन्याच्या १ ते १० तारखेस सर्व कायम सेवकांचे पगार अदा करण्यात आलेले आहे. मात्र, रोजंदारीवरील कामगारांचा पगार करण्यात आला नाही. पीएमपीएमएलला कामगारांच्या हितापेक्षा ठेकेदार व कंपण्यांचे हित जास्त महत्वाचे असल्याचा आरोप धुमाळ यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.