Pune : लॉकडाऊन काळातील टोल दरवाढ म्हणजे दुष्काळात तेरावा महिना : विवेक वेलणकर

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्गजन्य आजारामुळे उद्योग-धंदे ठप्प असताना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोल दरात १८टक्के वाढ करण्यात आली आहे. ही वाढ म्हणजे दुष्काळात तेरावा महिना, अशी संतप्त प्रतिक्रिया सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी व्यक्त केली आहे.

याबाबत बोलताना वेलणकर म्हणाले, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल दरांमध्ये २० एप्रिल पासून १८ टक्के वाढ झाली आहे. २००४ साली हा टोल सुरू करताना दर तीन वर्षांनी १८ टक्के दरवाढ करण्याचे ठरले होते, मात्र यामागचं गृहीतक होतं की, या रस्त्यावरील ट्रॅफिक दरवर्षी पाच टक्यांनी वाढेल.

२००४ ते २०१९ या काळात या हिशोबाने कंत्राटदाराला २८६९ कोटी रुपये मिळणार असे गृहीत धरून कंत्राट केले गेले. प्रत्यक्षात कंत्राटदाराने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार त्याला ४३६९ ( १५०० कोटी जास्त) कोटी रुपये मिळाले ( अर्थात ते कंत्राटदारांच्या खिशात गेल्याने शासनाला काही मिळाले नाही). ही वस्तुस्थिती असताना परत जुन्याच गृहितकावर आधारीत (५ टक्के वर्षाला ट्रॅफिक वाढ) ठरवलेली १८ टक्के टोल दरवाढ अत्यंत चुकीची आणि अन्याय्य आहे.

नवीन कंत्राट गेल्याच महिन्यात झाले आहे. त्यावेळी या सर्व बाबी विचारात घेऊन कंत्राट करणे आवश्यक होते. आता परत हे कंत्राट दहा वर्षांचे केले असल्याने, त्यात बदल करणे शक्य नाही असे सांगून शासन व प्रशासन हात झटकून मोकळे होईल.

कोरोनाच्या संकटामुळे भविष्यात कोणते आर्थिक संकट उभे राहील, या विवंचनेत असणाऱ्या व्यापार, उद्योग आणि सामान्य माणसाला ही टोलदरांमधील ही जाचक दरवाढ डोईजड होणार आहे. या विषयावर सगळेच राजकीय पक्ष मूग गिळून बसले आहेत हे उद्वेगजनक आहे, असे विवेक वेलणकर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.