Pune : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सील केलेल्या भागाचा अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव पाहता पुणे शहरातील काही भाग प्रशासनाने सील करण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर आज, मंगळवारी (दि. 7) उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यात आला.

या बैठकीसाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम्, पुणे महानगर पालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे आदी उपस्थित होते.

शहराच्या मध्यवर्ती भागात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने कोंढवा तसेच महर्षीनगर ते आर. टी. ओ. कार्यालयापर्यंतचा जुन्या पेठांचा भाग सोमवारी मध्यरात्रीपासून सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भागात संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी होत आहे.

सील केलेल्या भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आधिक आहे. त्यामुळे परिसरातील अन्य नागरिकांनाही संसर्ग होण्याच्या शक्यतेने प्रशासन याबाबत अधिक सक्रिय झाले आहे. सील केलेल्या भागातील नागरिकांनी संचारबंदीचे आदेश पाळून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.

सील केलेल्या भागातील दूध, भाजीपाला, गॅस, औषधे आदिंचा पुरवठा सुरु राहील. परिसरातील स्वच्छता गृहे, गल्लीबोळ निर्जंतुकीकरण करण्यावर अधिक भर देण्यात येणार आहे. डॉक्टर, अत्यावस्थ रुग्ण, अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना यातून सूट मिळेल.

परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे, संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी स्वयंसेवी संस्था पोलीस विभागातर्फे समुपदेशन करुन प्रशासन आपल्या पाठीशी असल्याची भावना लोकांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे,अशा स्वरुपाच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.