Pune: जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1,783 तर मृतांचा आकडा 99 वर

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या 1,783 पर्यंत पोहचली असून आतापर्यंत एकूण 99 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 309 रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळविले आहे. जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 1,375 सक्रिय रुग्ण असून त्यापैकी 76 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. 

ग्रामीण भागात एकूण 40 जणांना कोरोनाचा संसर्ग

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत एकूण 40 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला असून 12 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आता कोरोनाचे 24 सक्रिय रुग्ण आहेत. जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रांमध्ये केवळ बारामती नगरपालिकेच्या क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बारामती शहरात आढळलेल्या सात कोरोना रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला असून उर्वरित सहाजण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे बारामती शहर आता कोरोनामुक्त झाले आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 42 कोरोनाबाधित रुग्ण

जिल्ह्यातील तीन कॅन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रांमध्ये मिळून एकूण 42 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आतापर्यंत त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला असून सात रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 32 झाली आहे. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत 19 रुग्ण आढळून आले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून पाच रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत 21 कोरोना रुग्ण आढळले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून दोन जणांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे खडकीत सक्रिय रुग्णांची संख्या 17 झाली आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या क्षेत्रात काल दोन मुलींना कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर पिंपरी महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुणे विभागात 109 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

पुणे महसूल विभागात एकूण 1,986 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 109 जणांचा मृत्यू झाला असून 358 जण बरे होऊन घरी गेले आहेत. एकूण 1,519 रुग्ण पुणे विभागातील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी 77 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे शासकीय प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

पुणे विभागातील जिल्हानिहाय कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. पुणे 1783 (99 मृत्यू), सातारा 52 (2 मृत्यू), सोलापूर 106 (6 मृत्यू), सांगली 31 (1 मृत्यू), कोल्हापूर 14 (1 मृत्यू). पुणे विभागात आतापर्यंत एकूण 19 हजार 989 संशयितांचे स्वॅब नमुने कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी प्राप्त झालेल्या 19,044 अहवालांपैकी 17,058 जणांचे अहवाल कोरोना निगेटीव्ह असून 1986 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.