Pune : रात्री बारानंतर पोलिसांकडून नो पार्किंगमधील वाहनांना जॅमर, नागरिकांमध्ये नाराजी

एमपीसी न्यूज- पुणे शहरातील अनेक रस्त्यावर नो पार्किंग किंवा पार्किंगच्या जागेच्या बाहेर वाहन लावल्यास वाहतूक पोलीस जॅमर लावून दंडात्मक कारवाई करतात. मात्र याच वाहतूक पोलिसानी रात्री बारानंतर कारवाई करीत लक्ष्मी रस्त्यावर चार चाकी आणि दुचाकी वाहनांना जॅमर लावले. यावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या बाबत वाहतूक पोलीस उपायुक्त यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

पुणे शहरात जवळपास 40 लाखाहून अधिक लोकसंख्या असून त्या तुलनेत वाहनांची संख्या देखील त्याच्या बरोबरीने आहे. वाढत्या वाहनाच्या संख्येमुळे अनेक वेळा शहरातील रस्त्यावर पार्किंगवरून नागरिकांमध्ये भांडणाचे प्रकार घडतात. तर कधी जागा न मिळाल्याने नो पार्किंगच्या जागेवर गाडी लावल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. वाहनाला जॅमर लावला जातो किंवा गाडी उचलून घेऊन जातात. अशा घटना शहरातील बहुतांश रस्त्यावर आपल्याला रोज पाहायला मिळतात.

पुणे शहरातील सततचा वर्दळीचा रस्ता असणार्‍या लक्ष्मी रोडवर पार्किंगसाठी जागा मिळवायाची म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्यावर खरेदीसाठी येणार्‍या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने पार्किंग करिता जागा मिळणे अवघड असते. आता याच लक्ष्मी रस्त्याच्या लगत असणार्‍या इमारतीमध्ये राहणार्‍या नागरिकांच्या चार चाकी आणि दुचाकी वाहनांना वाहतूक पोलिसांनी 3 मार्च रोजी रात्री बारा वाजण्याच्या जॅमर लावून कारवाई केल्याचा प्रकार घडला आहे.

या कारवाईमुळे तेथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी रात्रीचा दिवस करून कारवाई केल्याचा स्थानिक नागरिकांकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या कारवाई बाबत वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.