Pune News : वाहतूक विभागाचा अजब कारभार; चलन एकाचे दंड दुसऱ्याला

एमपीसी न्यूज – वाहतुकीचे नियम मोडल्यास वाहतूक विभागाकडून ऑनलाइन चलन देण्यात येते. त्यातही पारदर्शकता म्हणून नियमभंग करणा-या वाहनाचा नियमभंग करतानाचा फोटो देखील दिला जातो. मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांकडून अजब प्रकार केला जात आहे. एका दुचाकीने केलेल्या नियमभंगाचा भुर्दंड दुसऱ्याच वाहनधारकाला देण्यात आला आहे. वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या नागरिकांना पुणे वाहतूक विभागाच्या या धोरणाचा उगाचच मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यात आणखी कहर म्हणजे पोलीस विभागाकडून दंड भरण्याबाबत नोटीस देखील पाठवण्यात आली आहे.

तळेगाव दाभाडे येथील रहिवासी हेमंत इनामदार यांच्याकडे सीडी डॉन (एम एच 14 / ए एल 8946) ही मोटारसायकल आहे. पुणे ग्रामीण वाहतूक विभागाकडून 27 डिसेंबर 2020 रोजी रात्री साडेनऊ वाजता ट्रिपलसीट मोटारसायकल चालवल्या बाबत 200 रुपये दंड आकारला आहे. याबाबत ऑनलाइन पाठवलेल्या चालनामध्ये पुरावा म्हणून वाहतूक विभागाकडून नियमभंग करतानाचा फोटो देखील जोडण्यात आला आहे.

प्रत्यक्षात त्या दिवशी त्यांची मोटारसायकल घरीच होती. वाहतूक विभागाकडून पाठवलेल्या चालनामध्ये हेमंत इनामदार यांच्या मोटारसायकलच्या क्रमांकाशी काही अंशी साधर्म्य असणारी पण वेगळ्याच कंपनीची (स्प्लेंडर) मोटारसायकल दिसत आहे. केवळ काही क्रमांकाचे साधर्म्य असल्याने त्या दुचाकीचा भुर्दंड हेमंत इनामदार यांच्या माथी मारण्यात आला आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनांची पडताळणी केल्याशिवाय चलन पाठवण्यात पुणे ग्रामीण वाहतूक विभागाकडून रस दाखवला जात आहे. डिजिटल व्यवस्था असल्यामुळे वाहतूक विभाग डोळेझाकपणे काम करत आहे.

अनेकदा असे प्रकार नागरिकांकडून समोर आणले जात नाहीत. प्रशासनाला जाब न विचारता पैसे भरून सुटका करून घेतली जाते. तर दंड आल्यानंतर देखील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणा-यांमध्ये सुद्धा असे फेक चलन येण्याची शक्यता आहे. पुणे ग्रामीण वाहतूक विभाग केवळ कारवाईचा आकडा फुगवण्यासाठी अशी चलने देत तर नाही ना? असा प्रश्न नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.

याबाबत हेमंत इनामदार म्हणाले, “मी नेहमी मोटारसायकल चालवताना वाहतुकीचे नियम वापरतो. 27 डिसेंबर 2020 रोजी रोजी माझी दुचाकी घरीच होती. तरीदेखील मी नियमभंग केल्याचा ठपका ठेवत एक नोटीस मला देण्यात आली आहे. तपासून बघितले असता हा अजब प्रकार उघडकीस आला. वाहतुकीचे नियम पाळणा-या नागरिकांना असा भुर्दंड लावला जात आहे. वाहतूक विभागाचे हे धोरण चुकीचे आहे.”

दरम्यान, नोटीस मध्ये 9855755798 हा हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. मात्र या क्रमांकावर फोन केला असता कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. नियमभंग केल्यास प्रशासनाकडून नागरिकांना दंड आकारला जातो, कारवाई केली जाते. परंतु प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे नागरिकांना त्रास होत असेल तर संबंधितांवर कारवाई का होऊ नये, असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.