BNR-HDR-TOP-Mobile

Pune : ट्रेकर्सनी अनुभवला थरारक वासोटा ट्रेक

एमपीसी न्यूज- शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्रच्या वतीने आयोजित केलेल्या वासोटा किल्ला मोहिमेच्या दुसर्‍या टप्प्यात 32 सदस्यांनी सहभागी होऊन बोटींग व जंगलसफारीचा थरारक अनुभव घेतला. सह्याद्रीच्या उत्तुंग शिखरावर वसलेला वासोटा किल्ला तसेच कोयना अभयारण्याची सैर करण्याची संधी यानिमित्ताने सर्व ट्रेकर्संना मिळाली.

कोयनेचा परिसर हा ट्रेकर्ससाठी नेहमीच आव्हान देत असतो. साहसाची अनुभूती देणारा वासोटा किल्ला अनेक दुर्गयात्रींचा आवडता किल्ला आहे. गिरीदुर्ग, वनदुर्ग आणि काही अंशी जलदुर्ग असलेल्या या किल्ल्यावर जाण्याची मोहीम शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्रचे प्रमुख प्रशांत साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली आखण्यात आली होती. या ट्रेकला परभणी, औरंगाबाद, पनवेल, कोल्हापूर, मुंबई, पुणे आदी ठिकाणाहून 32 ट्रेकर्स सहभागी झाले होते.

नैसर्गिक दुर्गमता लाभलेला वासोटा हा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्न आहे. कोयना अभयारण्य क्षेत्र तसेच व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील सर्व ठिकाणी येणारी सर्व पर्यटन स्थळे ही अतिदुर्गम व अतिवृष्टीच्या प्रदेशात मोडतात. वासोट्याला यावर्षी ट्रेकर्सनी भेट देऊन निसर्ग सौैंदर्याचा आस्वाद घेतला. गिर्यारोहक कॅम्पर्स यांनी वासोटा व नागेश्वर जंगल सफारीचा आंनद घेतला. टेटली गावातून बोटीने बामणोली मार्गे वासोट्याला जाणार्‍या ट्रेकर्संनी वन्यजीव विभागाकडून रितसर परवानगी घेतली होती.

त्या ठिकाणी कोयनेच्या विस्तीर्ण जलाशयातून बोटीने वासोट्याच्या पायथ्याजवळील मेट इंदवलीपर्यंत दीड तास तसेच किल्ल्यापर्यंत घनदाट जंगल व डोंगररांगातून 2 तास प्रवास केला. त्यामुळे ट्रेकर्सना एकप्रकारे जंगलसफारीचा थरारक अनुभव घेता आला. कोयनेचा शिवसागर जलाशय आणि त्याच्या भोवतीचे जंगल तर भटकंतीसाठी नंदनवनच ! या निबीड अरण्यातच वासोटा किल्ला आहे. राजा भोज याने बांधलेला शिलाहारांचा हा एक महत्त्वाचा गड. पुढे मराठयांच्या हाती असलेला आणि नंतर ताई तेलिणीच्या प्रसिद्ध लढयामुळे लक्षात राहिलेल्या या वासोटयाबद्दल प्रत्येकाच्या मनात प्रचंड कुतूहल असते. पण दुर्गम भाग आणि व्याघ्रगड हे नाव सार्थ ठरवेल असे घनदाट अरण्य; भोवतीने पुन्हा कोयनेचा जलाशय यामुळे या गडाला भेट देणे तसे सहजशक्य नाही.

या मोहिमेत अमोल जाधव, किरण अणदुरे, कौशल आचार्य, अंकुश चव्हाण, शुभम काळे, शैलेंद्र विठोरे, संजय मगर, जीत सोनी, सचिन पनाळे, उमेश परदेशी, आनंद मामीडवार, गणेश कुलकर्णी, कौस्तुभ पुलकुंडवार, नितीन नवले, रोहित मोहिते, सौरभ कुलकर्णी, बाळासाहेब काळे, हेमंत धायबर, विश्‍वास रिसबुड, सुभाष काटीकर, प्रसाद गोसावी, मुकुंद काळे, अमोल आसरे, दिलीप मावळे आदींनी सहभाग घेतला. याशिवाय परभणीतील ऐश्‍वर्या देशपांडे-आचार्य, गीता काटीकर, कुसुम हिरेमठ या तीन महिलांसह वेदांत काळे या लहान मुलाचाही मोहिमेत सहभाग होता.

.