Pune : कोरोनाचा मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रयत्न करा : महापौर

Try to reduce corona mortality: Mayor

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोरोनाचा मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या.

प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी स्वतंत्र स्वाब सेंटर सुरू करण्यात येणार असून, आतापर्यंत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या कारणांचा सविस्तर अहवाल मागविण्यात येणार आहे. त्याचा अभ्यास करून उपचार व्यवस्थेमध्ये बदल केले जातील, त्यामुळे मृत्यू दर कमी होण्यास मदत होईल, असेही महापौरांनी सांगितले.

पुणे शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी सोमवारी राज्य शासनाचे समन्वयक अधिकारी व पुणे महापालिका अधिकारी यांच्या समवेत परिमंडळ क्र. 2 घोलेरोड, परिमंडळ क्र. 1 ढोले पाटील रोड, परिमंडळ क्र. 3, 4 आणि 5 यांची बैठक आयोजित केली होती.

स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे एकूण 5 बैठका घेण्यात आल्या.

यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल, पशुसंवर्धन आयुक्त सच्चीद्र प्रताप सिंग, साखर आयुक्त सौरभ राव, संचालक भू- जल सर्वेक्षण कौस्तुभ दिवेगावकार, सहकार आयुक्त अनिल कवडे, अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय शिंदे, पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, शिरीष देशपांडे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, उपयुक्त नितीन उदास, विजय दहीभाते, जयंत भोसेकर, माधव देशपांडे, सुरेश जगताप, सर्व महापालिका सहाय्यक आयुक्त व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

आगामी काळात मृत्यू दर कमी करण्यासाठी नियोजनबद्ध काम आणि त्यादृष्टीने अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.

खाजगी डॉकटर्स आणि ICMR मान्यताप्राप्त लॅब व्यवस्थापनाकडून कोरोना रुग्ण व संशयित रुग्णांचा वैद्यकीय इतिहास सादर करणे यापुढे बंधनकारक करणार आहे.

त्यासाठी स्वतंत्र समन्वयकाची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे अशा रुग्णांवर वेळ वाया न जाता, तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे. तसेच, ॲम्ब्युलन्सची संख्या वाढविण्यात येणार आहे, असेही महापौर म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.