Pune : कोरोनाचा मृत्युदर कमी होण्यासाठी प्रयत्न करा : केंद्रीय पथकाची महापालिकेला सूचना

Try to reduce the death rate of corona: Central team informs NMC

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आणि कोरोनाचा मृत्युदर कमी करण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना केंद्रीय पथकाने पुणे महापालिकेला केल्या आहेत.

कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन हा कायमस्वरूपी पर्याय नाही. त्यानंतरही रुग्ण वाढतच राहणार आहेत. पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण 8 हजारांच्या पुढे गेले असून, 400 च्या वर मृत्यू झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव कुणाल कुमार, डॉ. अरविंद कुशवाह आणि डॉ. सितीकांता बॅनर्जी यांच्या पथकाने पुणे शहराचा पाहणी दौरा केला.

यापुढे कोरोनामुळे होणारे मृत्यू कमी होण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या वाढविणे, आरोग्य व्यवस्था उभी करण्यावर भर देण्याच्या सूचना या पथकाने महापालिकेला दिल्या आहेत.

सध्या कोरोनाला रोखणे आणि आर्थिक व्यवस्था पूर्वीप्रमाणे करणे आवश्यक आहे. जेष्ठ नागरिक आणि इतर आजार असलेल्या व्यक्तींच्या आरोग्य तपासण्या करण्यावर मोठ्या प्रमाणात भर द्यावा लागणार आहे.

आयसीयू बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची अधिकाधिक उपलब्धता करावी लागणार आहे. आगामी काळात मृत्यू रोखणे आवश्यक असल्याचे या पथकाने सांगितले.

तर, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा जास्तीत जास्त कोरोनाच्या चाचण्या करण्यात याव्यात, अशी मागणी राज्य शासनाकडे केली आहे.

लवकरच 24 कोटी रुपये खर्च करून 1 लाख चाचण्या वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे दिवसाला आणखी दोन हजार कोरोनाच्या चाचण्या होणार आहेत. त्यामुळे आणखी कोरोनाचे रुग्ण वाढण्याची भीती आहे.

मात्र, पुणेकरांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.