Pune : संगम घाटावर झोपलेल्या इसमाचा खून करणाऱ्या दोघांना अटक

बंडगार्डन पोलीसांनी 12 तासांच्या आत आवळल्या मुसक्या

एमपीसी न्यूज : पुण्यातील संगम घाटावर झोपलेल्या इसमाचा निर्घृण खून करून पसार झालेल्या दोघा आरोपींना अटक करण्यात बंडगार्डन पोलिसांना यश आले. तर त्यांचा अन्य एक साथीदार फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, या दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

निखील उर्फ भैय्या दिगंबर कांबळे (रा. ताडीवाला रोड, पुणे) व प्रदिप उर्फ गोट्या गोरख कटारनवरे (वय-25 वर्षे, रा. ताडीवाला रोड, पुणे) अशी अटक आरोपींची नवे आहेत. तर मंगेश विष्णू कांबळे ( रा. मंगळवारपेठ, पुणे), असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  बुधवारी  ( दि.29) सकाळी आरटीओ चौकाजवळील संगम घाटावरील पार्कींगच्या जागेत एका इसमाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर बंडगार्डन पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृत इसमाच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. त्यामुळे त्याची ओळख पटविण्यात अडचणी येत होत्या.

पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली असता मृत  इसमाचे नाव मंगेश विष्णू कांबळे असल्याचे समजले.  त्याच्या आईसह भावाकडे चौकशी केली असता त्याला नशापाणी करण्याचे व्यसन असल्याने तो घरी राहत नसल्याचे त्यांनी सांगितले.  त्यानंतर पोलिसांनी संगम घाटावर व्यसनाधीन आणि फिरस्त्यांकडे चौकशी केली असता मंगेशचे दोन ते तीन इसमांसोबत भांडण झाल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी संबंधितांचा शोध घेत त्यांना ताडीवाला रोड भागातील नदीकिनारी जाऊन ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, या खूनप्रकरणातील तिसरा आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ही कारवाई परिमंडळ 2 चे पोलीस उप-आयुक्त शिरीष सरदेशपांडे, लष्कर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रविंद्र रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिगंबर शिंदे यांच्या सुचनांप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संदिप जमदाडे, निखिल जाधव, गौरव उभे, सागर जगताप, अय्याज दड्डीकर, कैलास डुकरे, रुपेश पिसाळ, किरण तळेकर, हरीष मोरे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.