सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

Pune : बत्तीस वर्षानंतर स्वीडनच्या बहिणीला मिळाली दुरावलेली पुण्यातील बहीण

एमपीसी न्यूज- ‘दुनिया गोल आहे’ आहे हे जसे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे तसाच माणसाच्या नशिबाने देखील त्याचा पुरावा अनेकवेळा दिला आहे. एखादा आपला जिवलग कुठेतरी हरवतो आणि अनेक वर्षानंतर तो पुन्हा अचानकपणे आपल्यासमोर दत्त म्हणून उभे राहतो. आणि मग आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली जाते. असाच एक हृदयस्पर्शी प्रसंग पुण्यात घडला आहे. परदेशात स्थायिक झालेली महिला आपल्या आईच्या शोधात पुण्यात आली आणि आईचा शोध घेत असताना आईचे निधन झाल्याचे समजले. पण नशिबाने तिला निराश केले नाही आईचे दर्शन घडले नाही पण तिची सख्खी बहीण बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये तिला सापडली आणि ‘दुनिया गोल आहे’ याचा प्रत्यय आला.

विओ नेहा या महिलेला 32 वर्षांपुर्वी स्वीडनमध्ये दत्तक देण्यात आलं होतं. नेहाची आई ही मुळची उस्मानाबादची मात्र दुर्दैवाने ती वेश्या व्यवसायात ढकलली गेली. पुढे पुण्यातल्या ससून रुग्णालयात नेहाचा जन्म झाला. त्यानंतर तिला स्वीडनच्या एका कुटुंबियांकडे दत्तक देण्यात आले. नेहा स्वीडनला गेली. नेहाला दत्तक देताना काही कागदपत्रे स्वीडनच्या कुटुंबियांकडे देण्यात आली.

नेहाचं स्वीडनमधील नाव नेहा होलनग्राम असं आहे. नेहाच्या पतीने कॅनडामधील एका सामाजिक संस्थेशी संपर्क साधत आपल्या पत्नीचं कोण नातेवाईक जिवंत आहेत कायाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तिची बहीण जिवंत असल्याचे समजले. त्वरित नेहा आपल्या बहिणीची भेट घेण्यासाठी बुधवारी (दि. 29) पुण्यात आली. तिला तिची बहीण मिळाली पण या ३२ वर्षाच्या कालावधीत तिची आई मात्र हे जग सोडून गेली होती.

नेहाची बहीण ही सध्या बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करते. नेहा तिची मोठी बहीण आहे. मात्र नेहाच्या मनातील शंका दूर करण्यासाठी आता तिची डीएनए टेस्ट केली जाणार आहे. डीएनए चाचणी करण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. तिच्या डीएनए चाचणीची प्रक्रीया लवकरात लवकर पूर्ण करुन ती स्वीडनला परत जाणार आहे.

नेहा हिला तिची बहीण शोधून देण्यामध्ये महत्वची भूमिका बजावलेल्या कायाकल्प संस्थेच्या सीमा वाघमोडे म्हणाल्या, ” नेहाच्या मदतीसाठी आम्ही अक्षरशः बुधवार पेठेचा परिसर पिंजून काढला आणि उपलब्ध माहितीच्या साहाय्याने नेहाची बहीण शोधून काढली”

याबाबत विओ नेहा म्हणाली , “32 वर्षानंतर मला माझी बहीण मिळाल्याचा मला आनंद वाटतो. डीएन ए चाचणी केल्यानंतर आता पुढे काय निर्णय घ्यायचा ते ठरवले जाईल”

spot_img
Latest news
Related news