Pune : अडीच वर्षाच्या मुलीवर रेल्वेच्या डब्यामध्ये बलात्कार ; मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज- पुणे स्टेशन परिसरातील फुटपाथवर आईसोबत झोपलेल्या अडीच वर्षाच्या मुलीला मंगळवारी (दि. २७) पहाटे उचलून नेत तिच्यावर रेल्वेच्या डब्यामध्ये नेऊन बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बेशुद्धावस्थेत सापडलेल्या या मुलीवर उपचार सुरु असता संध्याकाळी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

याबाबतची माहिती अशी की, पीडीत मुलीचे आई-वडील पुणे स्टेशन येथील मालधक्का चौकाजवळील फुटपाथवर राहतात. पीडीत मुलीची आई मुकबधिर आहे. लिंबू, मिरची, खेळणी विकून आपला उदरनिर्वाह करतात. सोमवारी रात्री ती मालधक्का चौकातील फुटपाथवर मुलीसह झोपली होती. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास अनोळखी इसमाने मुलीला उचलून नेले. मुलीच्या आईला जाग आल्यानंतर त्यांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण, मुलगी सापडली नाही.

दरम्यान, पुणे रेल्वे स्थानक परिसरात गस्त घालत असताना लोहमार्ग पोलिसांना रेल्वेच्या डब्यामध्ये मुलगी बेशुद्धावस्थेत आढळून आली. तिच्या अंगावर जखमा आढळून आल्या. पोलिसांनी त्वरित तिला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिच्या पालकांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता, मालधक्का चौकात मुलीच्या आई-वडिलांनी मुलीचे छायाचित्र ओळखले. मुलीवर उपचार सुरु असल्याचे सांगितले मात्र दुर्दैवाने उपचार सुरू असताना संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास या मुलीचा मृत्यू झाला.

याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून हे प्रकरण बंडगार्डन पोलिसांकडे वर्ग केलं आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.