Pune : टायफून्सने पटकावले पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धचे विजेतेपद

एमपीसी न्यूज – पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत टायफून्स आणि लायन्स संघामध्ये विजेतेपदासाठीच्या झालेल्या अंतिम लढतीत टायफून्स संघाने लायन्स संघावर 48 धावांनी मात करीत विजेतेपदावर आपले नाव कोरले.

पूना क्लबच्या वतीने आयोजित पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना पूना क्लबच्या मैदानावर रविवारी (दि 16) पार पडला. अंतिम फेरी गाठलेल्या टायफून्स आणि लायन्स संघामध्ये हा सामना झाला. टायफून्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 2 बाद 89 धावा केल्या. विजयासाठी 90 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लायन्स संघाला 7 गड्यांच्या बदल्यात केवळ 42 धावाच करता आल्या. टायफून्स संघाच्या भेदक गोलंदाजीच्या मारा पुढे लायन्सचे फलंदाज तग धरू शकले नाहीत आणि 48 धावांनी टायफून्स संघाने अंतिम सामना जिंकला.

विजेत्या संघाला रोख पारितोषिक आणि करंडक देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी जेट सिंथेसिसचे अध्यक्ष राकेश नवाणी, जितेंद्र घडोक ग्रुपचे जितेंद्र घडोक, आदर्श हेगडे, सचिन राठी, पूना क्लबचे अध्यक्ष राहुल ढोले पाटील, उपाध्यक्ष नितीन देसाई, स्पोर्टस चेअरमन शशांक हळबे व इतर मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.