Pune : छत्रपती शिवाजी महाराज हेच एकमेव ‘जाणता राजा’ – उदयनराजे भोसले

एमपीसी न्यूज- महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. छत्रपती एकमेव जाणते राजे होते, दुसऱ्या कोणालाही म्हणण्याचा अधिकार नाही, अन्यथा तो महाराजांचा अवमान ठरेल, अशा शब्दात माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली. उदयनराजे भोसले यांनी भाजप नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर सडकून टीका केली. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांच्या नावाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे वापर करणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस मनसे या सारख्या राजकीय पक्षांचा देखील त्यांनी खरपूस समाचार घेतला. उदयनराजे भोसले आज, मंगळवारी पुण्यात रेसिडेन्सी क्लब येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

माजी खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, ” या पुस्तकामुळे मलाच नाही शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला वाईट वाटले, गोयल यांनी महाराजांची तुलना मोदी यांच्याशी केली. जगात महाराजांबरोबर बरोबर कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. युगपुरुष कधी तरी जन्माला येतो, अलीकडच्या काळात जाणता राजा उपमा देता, त्याचाही मी निषेध करतो. शिवाजी महाराज यांनी कधीही स्वतः चे घर भरले नाही, रयतेचे राजे म्हणून उपमा, कोणीही उठसुठ काहीही बोलायचे, आम्ही त्या घराण्यात जन्माला आलो, त्याचा आम्हाला अभिमान आहे. त्या घराण्यात आम्ही जन्माला आलो, हे सौभाग्य, आम्ही महाराजांच्या नावाचा कधीही दुरूपयोग केला नाही. आम्ही ऐकून घ्यायचे?” असा संतप्त सवाल उदयनराजे यांनी केला.

शिवसेनेवर कडाडून हल्ला चढवताना उदयनराजे म्हणाले, ” शिवसेना, शिववडा अशी नवे कशी चालतात ? शिववडा असं नाव ठेवता तेव्हा आदर कुठे जातो ? शिवसेना असं नाव दिलं तेव्हा वंशजांना विचारलं होतं का ? सोयीप्रमाणे वापर करायचा आणि सोयीप्रमाणे विसरायचं हीच यांची लायकी आहे. शिवसेनेने नाव बदलून ठाकरेसेना करावं. नाव बदलल्यानंतर राज्यातील किती तरुण तुमच्यासोबत राहतात हे मला पहायचं आहे” असे आव्हान उदयनराजे यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.