Pune : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत असल्याने बाळासाहेबांचे स्वप्न साकार ; पुण्यातील शिवसैनिकांच्या भावना

एमपीसी न्यूज – शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची मुंबईतील शिवतीर्थावर शपथ घेणार असल्याने स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार होत असल्याच्या भावना पुण्यातील शिवसैनिकांनी व्यक्त केल्या. शपथविधीचा सोहळा ‘ना भूतो ना भविष्यती’ असाच होणार असल्याने पुण्यातील हजारो शिवसैनिक मुंबईला दाखल झाले आहेत.

आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत असल्याने आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आमचे राज्यात सरकार आल्याने पुणेकरांच्या प्रलंबित समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पुणे महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी सांगितले. या महाविकास आघाडीतर्फे शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे, राज्याचा विकास करण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे म्हणाले. गटनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक विशाल धनवडे, संजय भोसले, बाळा ओसवाल, प्रमोदनाना भानगिरे, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी हजारो शिवसैनिकांना मुंबईत नेण्यासाठी सोय केली आहे. पुण्यातील पदाधिकारीही मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाल्याची माहिती समजते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.