Pune : अनोळखी फेसबुक मैत्री पडली महागात, पुण्यातील महिलेला तब्बल 43 लाखाचा गंडा

Unfamiliar Facebook friendship fell expensive, a woman in Pune was robbed of Rs 43 lakh:अमेरिकन डॉलर, सोन्याची चैन, ॲपल मोबाईल, महागडी घड्याळे देण्याच्या आमिषाने घातला गंडा

एमपीसीन्यूज : अनोळखी व्यक्तीची फेसबुकवर आलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे पुण्यातील कात्रज परिसरातील महिलेला चांगलेच महागात पडले. संबंधित व्यक्तीने या महिलेला अमेरिकन डॉलर, सोन्याची चैन, ॲपल मोबाईल, महागडी घड्याळे देण्याच्या आमिषाने वेळोवेळी तिच्याकडून तब्बल 43 लाख रुपये लुबाडले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच 51 वर्ष पीडित महिलेने याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला एका खासगी कंपनीत नोकरी करते. काही महिन्यापूर्वी तिला तिच्या फेसबुक अकाऊंटवर एका अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती.

या महिलेने ही रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर त्यांच्यात चॅटिंग सुरू झाले. त्यांनी एकमेकांच्या मोबाईल नंबरची देवाणघेवाण केली आणि त्यातून त्यांची ओळख वाढत गेली.

दरम्यान, आरोपीने फिर्यादी महिलेला महागडी घड्याळे, ब्रेसलेट, अमेरिकन डॉलर, सोन्याची चैन यासारख्या भेटवस्तू कुरियर केल्याचे सांगितले.

तसेच या वस्तू मिळण्यासाठी जीएसटी, आरबीआय ड्युटी टॅक्स, कस्टम ड्युटी भरण्याच्या नावाखाली या महिलेला बँक खात्यात ऑनलाइन रक्कम भरण्यास सांगितले.

त्यानुसार पीडित महिलेने वेळोवेळी 43 लाख पस्तीस हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात भरले. मात्र, एवढे पैसे भरूनही गिफ्टचे कुरियर न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे पीडित महिलेच्या लक्षात आले.

त्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दिली.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष बर्गे करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.