Pune News : एशियन आणि वर्ल्ड रोलर स्केटिंग स्पर्धा निवड चाचणीसाठी एलएक्सटी युनायटेड क्लबच्या बारा खेळाडूंची निवड

एमपीसी न्यूज – हँगझोउ, चीन येथे 10 ते 25 सप्टेंबर आणि अर्जेंटिना येथे 24 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या एशियन आणि जागतिक रोलर स्केटिंग स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी एएक्सटी युनायटेड स्केटिंग क्लबच्या (पुणे आणि मुंबई ) 15 ते 26 वयोगटातील तब्बल 12 खेळाडूंची निवड झाली. याबाबत क्लबचे संचालक आणि प्रशिक्षक राहुल राणे, अनिल पेडणेकर (AIRSS) आणि अजय शिवलानी (TSA) यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

हँगझोउ आणि अर्जेंटिना येथे होणाऱ्या एशियन आणि जागतिक रोलर स्केटिंग स्पर्धेत थेट उतरण्यापूर्वी खेळाडूंची पंजाबमधील मोहाली येथे एशियन स्पर्धेसाठी 19 ते 21 एप्रिल दरम्यान तर जागतिक स्पर्धेसाठी 29 एप्रिल ते 1 मे दरम्यान निवड चाचणी होणार आहे.  क्लबचा चैतन्य आफळे हा खेळाडू मोहाली येथे निवड चाचणीसाठी नुकताच रवाना झाला.

दुर्गा मिरजकर (सर्वात लहान मुलगी), सुकृत वैद्य (सर्वात लहान मुलगा), अनिश बिरनाळे, अनय जालान, स्मीत साप्रिया, आर्या जुवेकर, अपूर्वा कुलकर्णी, खुशी शाह, स्नेहा तैष्टे, समृद्धी शिंदे, अथर्व कुलकर्णी, चैतन्य आफळे यांची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी खेळाडूंची कशी तयारी करून घेतली जाते या संदर्भात प्रशिक्षक राहुल राणे म्हणाले की, एखाद्या खेळाडूला शारीरिकदृष्टया सक्षम बनवणे ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. पुढे आठ ते दहा वर्षांचा कालावधी डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे प्रशिक्षणाची आखणी आम्ही करतो. आम्ही कार्डिओ मस्क्युलर आणि व्हॅस्क्युलर स्नायूंवर कसरत करवून घेतो. तर ताकद आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी जिम ट्रेनिंग, सायकलिंग आणि स्विमिंग अशी संमिश्र शारीरिक कसरत करवून घेतो.

शर्यत असो की निवड चाचणी मुलांचे मानसिक सामर्थ्य टिकून राहणे महत्वाचे असते त्यासाठी आम्ही खेळाडूंना माइंड ट्रेनिंग अंतर्गत शर्यतीची रणनीती आखणे, शर्यतीतील विरोधक खेळाडूचा अभ्यास तसेच वास्तविकता तपासणी आणि अंतिम सादरीकरण यावर लक्ष केंद्रित करण्याचे प्रशिक्षण देतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.