Pune University News : संरक्षण विषयात भारतात पाचशे विद्यार्थ्यांकडून संशोधन होणार – डॉ. जी. सतीश रेड्डी

विद्यापीठात 'डिफेन्स टेक्नॉलॉजी' अभ्यासक्रमास सुरुवात

एमपीसी न्यूज – डिफेन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू असून, देशभरात जवळपास पाचशे जणांकडून यावर संशोधन करण्यात येणार आहे, अशी माहिती संरक्षण विभागातील रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाचे सचिव व संरक्षण संशोधन विकास संस्थेचे अध्यक्ष (DRDO) डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग आणि ‘इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स सायंटिस्ट अँड टेक्नॉलॉजिस्ट’ (आयडीएसटी), पुणे शाखा यांच्यात 27 ऑगस्ट रोजी सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात डॉ. रेड्डी बोलत होते.

या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे, संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्थेचे कुलगुरू डॉ. सी. पी. रामनारायण, आयडीएसटीचे अध्यक्ष डॉ. सी. एल. धामेजनी व डिफेन्स क्षेत्रातील अनेक अधिकारी उपस्थित होते. या करारानुसार विद्यापीठात ‘डिफेन्स अँड टेक्नॉलॉजी’ विषयात पीजी डिप्लोमा सुरू करण्यात आला आहे.

डॉ. रेड्डी म्हणाले, गेल्या काही वर्षांत ‘डिफेन्स अँड टेक्नॉलॉजी’ क्षेत्रात भारत मोठी प्रगती करत आहे. संरक्षण मंत्रालयाकडून यासाठी संरक्षण विषयातील शिक्षणावर भर दिला जात असून यातून कौशल्य असणारे मनुष्यबळ निर्माण करण्यात येणार आहे. सध्या दोन हजारांहून अधिक उद्योग या कामात आहेत. तर एक हजाराहून अधिक ‘स्टार्टअप’ संरक्षण विषयात होत आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थ्यांना पारंपरिक अभ्यासक्रमाबरोबर  नवनवीन अभ्यासक्रम देण्यात कायमच अग्रेसर आहे. या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना या क्षेत्राकडे वळण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळेल, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी सांगितले.

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिफेन्स टेक्नॉलॉजी

कालावधी- एक वर्ष

पात्रता- अभियांत्रिकी किंवा विज्ञान विषयातील पदवीधर

सेमिस्टर – दोन

श्रेयांक- ३२

अधिक माहिती- www.unipune.ac.in

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.