Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने सार्थ श्री नामदेव गाथेचे प्रकाशन

एमपीसी न्यूज – कर्मठ लोकव्यवहाराने कुलुपबंद केलेला ज्ञानव्यवहार मुक्त करीत प्रेम, समता, बंधुता यासारख्या मानवीमूल्यांनी समाजमनाचे सक्षमीकरण घडवणारे संत म्हणजे चालतीबोलती मुक्त विद्यापीठे होत, असे गौरवोद्गार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर यांनी पुणे विद्यापीठ प्रकाशित करत असलेल्या नामदेवरायांच्या सार्थ गाथेच्या प्रथम खंडाचे प्रकाशन करतेवेळी काढले.

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संत नामदेव अध्यासन कार्यरत आहे. अध्यासनाचे पहिले प्रमुख डॉ. अशोक कामत यांच्या कार्यकाळात सार्थ श्री नामदेव गाथा हा प्रकल्प सुरू झाला. शासकीय नामदेव गाथा प्रमाण मानून त्यातील संत नामदेवांचे सुमारे २१०७ अभंग अर्थासहित टंकलिखित स्वरूपात सिद्ध करण्यात आले.  डॉ. ओमश्रीश गोपीनाथ महाराज श्रीदत्तोपासक यांना हा प्रकल्प पूर्ण करण्यास सुमारे बारा वर्ष लागली.

अभंगांची संहिता, पाठभेद, सुगम अर्थ असे या प्रकल्पाचे प्रारूप आहे. हा प्रकल्प टंकलिखित खंडांमध्ये अध्यासनामध्ये आहे. संत नामदेव अध्यासनाचे विद्यमान प्रमुख डॉ. सदानंद मोरे, संत तुकाराम महाराज अध्यासनाचे प्रमुख प्रा. अभय टिळक यांनी या प्रकल्पाचे संशोधन मुल्य लक्षात घेऊन हा प्रकल्प पुस्तक रूपाने प्रकाशित होण्यासाठी माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याशी चर्चा केली होती. डॉ. श्रीदत्तोपासक यांनी या प्रकल्पाला प्रस्तावनेची जोड दिली. २५० अभंगांचा समावेश असलेल्या या प्रकल्पाचा पहिला खंड नुकताच डॉ. नितीन करमळकर यांच्या कार्यकालाच्या अखेरच्या दिवशी छोटेखानी समारंभात त्यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. यावेळी माजी प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार उपस्थित होते.

 

संत नामदेव अध्यासनाचे प्रमुख डॉ. सदानंद मोरे यांनी प्रकल्पामागील भूमिका विशद केली. भावी काळात प्रस्तुत प्रकल्प खंडश: प्रकाशित होणार आहे. या प्रसंगी संत तुकाराम महाराज अध्यासनाचे प्रमुख प्रा. अभय टिळक, संत ज्ञानदेव अध्यासनाचे प्रमुख डॉ. दिलीप धोंडगे हे ही उपस्थित होते.
यावेळी या प्रकल्पाचे प्रारंभीचे टंकलेखक गणेश कारकर, विद्यापीठ अल्युमिनी असोसिएशनचे संपर्क प्रमुख प्रतीक दामा तसेच नामदेव समाजातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.