Pune : संभाजी उद्यानात संभाजी महाराजांचा पुतळा बसवल्याने खळबळ

एमपीसी न्यूज- सोमवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींकडून संभाजी उद्यानात संभाजी महाराजांचा पुतळा बसवल्याचे आज, मंगळवारी सकाळी उघडकीस आले आहे. त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली असून परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याच ठिकाणी पूर्वी नाटककार राम गणेश गडकरी यांच्या पुतळा होता..परंतु संभाजी ब्रिगेडच्या वतीने हा पुतळा पाडण्यात आला होता. तेव्हापासून या जागेवर पुतळा बसवण्यावरून वाद होते. 

जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी उद्यानात महापालिकेकडून छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. त्यासाठी चौथरा बांधून पूर्ण झाला आहे. त्याचप्रमाणे या जागेवर बसवण्यात येणार पुतळा देखील तयार झालेला आहे. काल , सोमवारी मध्यरात्री अचानक काही जणांनी या चौथऱ्यावर संभाजी महाराजांचा एक छोटा पुतळा नेऊन ठेवला. त्याचप्रमाणे पुतळा इथं नेऊन ठेवणाऱ्या गणेश कारले नावाच्या तरुणाने त्या पुतळ्यासोबत सेल्फी घेतला आहे. हा पुतळा इथून हलवल्यास गंभीर परिणाम होतील असा आशय असलेला मजकूर लिहिलेला कागद या चौथऱ्यावर चिकटवण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांची धावपळ उडाली. त्वरित या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी पुतळा येथून हलवला.  दोन वर्षांपूर्वी संभाजी ब्रिगेडकडून याच उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवण्यात आला होता. त्यानंतर संभाजी उद्यानात महापालिकेकडून चोवीस तास सुरक्षारक्षक ठेवले जात असतानाही चौथऱ्यावर हा पुतळा नेऊन ठेवल्याने खळबळ उडाली आहे. महापालिकेकडून बसवण्यात येणारा पुतळा भव्य असुन छत्रपती संभाजी महाराज बुधभूषण ग्रंथाची रचना करतानाची प्रतिमा त्यामधून साकारण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक परवानग्या देखील मिळवण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.