Pune Unlock News: शहरातील दुकाने व व्यवसायांची वेळ रात्री नऊपर्यंत वाढविण्याबाबत लवकरच आदेश – महापौर

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका क्षेत्रातील दुकाने व व्यवसाय यांना देण्यात आलेली सायंकाळी सातपर्यंतची वेळ रात्री नऊपर्यंत वाढविण्याबाबत महापालिका आयुक्तांना सूचना देण्यात आली असून त्यासंदर्भात लवकरच आदेश निघेल, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. 

या संदर्भात महापौर मोहोळ यांनी रात्री उशिरा ट्वीट केले.

लॉकडाऊनच्या काळात दुकाने व व्यवसाय बंद ठेवावे लागल्यामुळे दुकानदार व व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर दुकानदार व व्यावसायिकांकडून दुकानांची वेळ रात्री नऊपर्यंत वाढविण्याबाबत सातत्याने मागणी होत आहे.

नोकरदार नागरिकांना आवश्यक खरेदीसाठी संध्याकाळी सातपर्यंतची वेळ अत्यंत गैरसोयीची आहे. त्यामुळे नागरिकांकडूनही दुकानांची वेळ वाढविण्याबाबत मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यासंदर्भातील आदेश निघाल्यास पुणेकरांना मोठा दिलासा मिळू शकतो.

हॉटेल, रेस्टॉरंट, फूड कोर्ट, बार यांना रात्री दहा पर्यंत व्यवसायाची परवानगी देण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर दुकानदार व अन्य व्यावसायिकांना रात्री नऊपर्यंत मुदत वाढवून देण्याच्या सूचना महापौरांनी केल्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.