Pune Unlock News : सकाळी 7 ते 2 पर्यंत दुकाने उघडण्याचा आदेश फक्त पुणे शहरासाठीच, ग्रामीण भागासाठी आधीचीच नियमावली लागू

एमपीसी न्यूज – राज्यभरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन राज्यातील लॉकडाउन पंधरा दिवसांनी पुढे वाढवण्यात आला आहे. परंतु असे असले तरी ज्या जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी आहे तेथील नियमावली ठरवण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे.

यामुळेच पुणे शहरातील रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाल्यामुळे महापालिका प्रशासनाने महापालिका हद्दीत नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नवीन नियमावलीनुसार पुणे शहरातील सर्वच दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. हा निर्णय फक्त पुणे शहरापुरता मर्यादित आहे. ग्रामीण भागातील दुकाने मात्र पूर्वीच्याच आदेशानुसार बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी काढलेल्या आदेशानुसार, पुणे जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी कोणत्याही नागरिकांना कोविड चाचणीचा निगेटिव्ह अहवाल जवळ बाळगणे बंधनकारक आहे.

मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून दोन पेक्षा जास्त व्यक्तींना प्रवास करण्यास परवानगी नाही. या वाहनांमधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीजवळ सात दिवसांपर्यंत वैध असलेला covid-19 निगेटिव चाचणीचा अहवाल जवळ बाळगणे बंधनकारक आहे.

पुणे जिल्ह्यातील दूध संकलन केंद्र, दूध वाहतूक व दूध प्रक्रिया केंद्र कोणत्याही बंधनाशिवाय सुरू राहतील. जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्या आस्थापना व दुकानांमधून दुधाची किरकोळ विक्री करण्यासाठी यापूर्वी जारी केलेल्या आदेशानुसार परवानगी असेल तसेच घरपोच सेवा देण्यास परवानगी असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.