Pune Unlock : पुण्यातील निर्बंधांमध्ये शिथिलता; उद्यापासून सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व दुकानांना परवानगी !

एमपीसी न्यूज – पुण्यात गेल्या दोन महिन्यांपासून कठोर निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यानंतर आज गेल्या 24 तासात अवघे 180 रुग्ण समोर आले आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून व्यापारी वर्गाला मोठा दिलासा देण्यात आला आहे.

नवीन आदेशानुसार अत्यावश्यक सेवेसह सर्व प्रकारच्या दुकानांना सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विक्रम कुमार यांनी दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरामधील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाली आहे.त्यामुळे अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त अन्य व्यापारी वर्गाकडून दुकाने सुरु करण्याची मागणी केली जात होती.

नवीन आदेशात या व्यापारी वर्गाला महापालिकेकडून दिलासा देण्यात आला असून सर्व प्रकारच्या दुकानांना सोमवार ते शुक्रवारी सकाळी सात ते दुपारी 2 या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. नवीन आदेश हे पुढील दहा दिवसांसाठी असणार आहे. संसर्ग वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लावणार असल्याचे देखील जाहीर करण्यात आले आहे.

पुणे महापालिकेचे नवीन आदेश पुढीलप्रमाणे:
* पुणे शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी.
* बँकांचे कामकाज सुरु राहणार.
* अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरु राहणार.
* रेस्टॉरंट आणि बार हे फक्त पार्सल आणि घरपोच सेवेसाठी सुरू राहतील.
* ई- कॉमर्स मार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच इतर वस्तू यांची घरपोच सेवा सुरु करण्यास मुभा
* शहरात दुपारी 3 नंतर वैद्यकीय सेवा व इतर अत्यावश्यक कारण, सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास पूर्णतः बंदी.
*महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालये (अत्यावश्यक / कोरोना विषयक कामकाज करणाऱ्या कार्यालयां व्यतिरिक्त) 25 टक्के अधिकारी/ कर्मचारी यांच्या उपस्थितीत सुरु राहतील.
* कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्याच्याशी निगडित देखभाल व दुरुस्ती सेवा ) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती हे आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहणार.
* मद्याविक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरु राहणार

हे राहणार बंद
सिनेमागृह, नाट्यगृह, ओडिटोरिम, मनोरंजन पार्क, अम्युजमेंट पार्क, जिम, जलतरण तलाव, क्रीडा संकुल
* चित्रपट, मालिका, जाहिरातींचे शूटिंग बंद
* उद्याने, मोकळ्या जागा, मैदाने बंद रहाणार
* सर्व प्रकारची धार्मिक स्थळे
*पालिका हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था
* सर्व प्रकारचे धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम, सभा, आंदोलने
* मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, आठवडी बाजार बंद राहणार
* लग्न, सार्वजनिक कार्यक्रम, समारंभ यावरील निर्बंध कायम

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.