Pune : ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर खरेदीसाठी प्रभागातील 25 लाखाचा निधी वापरा : हरिदास चरवड

Use Rs 25 lakh in ward for purchase of oxygen bed, ventilator: Haridas Charwad : जेष्ठ नागरिक आणि अत्यवस्थ रुग्णांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड न मिळाल्याने मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे.

एमपीसी न्यूज – सिंहगड रोड, लगड मळा येथील स्व. मुरलीधर पांडुरंग लायगुडे दवाखान्यात ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर आणि इतर वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी प्रभाग क्रमांक 33 अ मधील 25 लाख रुपये निधी वापरण्यात यावा, असा प्रस्ताव भाजपचे नगरसेवक हरिदास चरवड यांनी स्थायी समितीला दिला आहे.

येत्या मंगळवारी (दि. 28 जुलै) सकाळी समितीच्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण पुणे शहरात वाढला आहे.

दररोज रुग्णसंख्या नवनवे उच्चांक गाठत आहे. कोरोनाने गंभीर स्वरूप धारण केलेले आहे. त्यातच जेष्ठ नागरिक आणि अत्यवस्थ रुग्णांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड न मिळाल्याने मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे.

या साहित्याच्या खरेदीसाठी प्रभाग क्रमांक 33 अ (वडगाव धायरी – वडगाव बुद्रुक) साठीच्या 2020 – 21 च्या अंदाजपत्रकातील 25 लाख रुपये निधी वापरण्यात यावा, अशी मागणी हरिदास चरवड यांनी केली आहे.

दरम्यान, पुणे शहरात रोज 7 हजारांच्या आसपास कोरोनाच्या चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामध्ये 1600 ते 1800 रुग्ण आढळून येत आहेत.

31 जुलै पर्यंत 27 हजार सक्रीय रुग्ण होणार असल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी सौरभ राव यांनी दिली आहे.

सध्या पुणे शहरात कोरोनाचे 44 हजार 65 रुग्ण झाले आहेत. 25 हजार रुग्णांनी वेळीच उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे.

शहरात 17 हजार 53 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. या रोगामुळे आतापर्यंत 1 हजार 104 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.