Pune : ‘कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘smart city command center’चा प्रभावी वापर करा’

केंद्रीय पथकाचा सल्ला; स्मार्ट वॉर रूमला भेट, घेतला पुण्यातील परिस्थितीचा आढावा

एमपीसी न्यूज : कोरोनाचा प्रादुर्भाव नेमका कुठे व कसा होत आहे हे लक्षात घेऊन परिस्थितीचे बारकाईने विश्लेषण करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी स्मार्ट सिटी कमांड सेंटरचा अत्यंत प्रभावीपणे वापर होत असल्याचे दिसून येत आहे. या यंत्रणेचा जास्तीत जास्त उपयोग करावा, असा सल्ला केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय पथकाने दिला आहे.

पुणे स्मार्ट सिटी कमांड सेंटर येथील कोरोना वॉर रूमला भेट देऊन या पथकाने पुणे शहरातील कोरोना संबंधीचा आढावा घेतला.

कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक पुण्यात दाखल झाले असून या पथकाच्या सदस्यांनी आज ( शनिवारी ) महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त व पुणे स्मार्ट सिटीच्या सीईओ रुबल अग्रवाल यांच्याशी चर्चा केली. यावेळी आरोग्य विभागप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, डॉ. संजीव वावरे, आयटी विभागप्रमुख राहुल जगताप व इतर अधिकारी उपस्थित होते.

कोरोना आपत्ती व्यवस्थापनात भारतातील मोजक्या शहरांमध्येच स्मार्ट सिटी कमांड सेंटरचा पूर्ण क्षमतेने वापर होत आहे. त्यात पुणे स्मार्ट सिटीची कामगिरी उल्लेखनीय आहे, असे केंद्रीय पथकाने आवर्जून नमूद केले.

कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधित क्षेत्रांमधील सर्वेक्षण, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, विलगीकरण, क्वारंटाईन कार्यवाहीची माहिती घेऊन त्याबाबतच्या सूचना पथकातील अधिकाऱ्यांनी केल्या.

यावेळी आयुक्त गायकवाड यांनी पुणे शहरातील वाढणाऱ्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधाच्या दृष्टीने सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच रुबल अग्रवाल यांनी स्मार्ट वॉर रूमच्या माध्यमातून डॅशबोर्ड व विविध कामांचा समन्वय याबद्दलचे सादरीकरण केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.