Pune : कॉसमॉस बँक निवडणुकीत ‘उत्कर्ष पॅनेल’ला भरघोस मतांनी विजयी होण्याची खात्री

पत्रकार परिषदेत अध्यक्ष मिलिंद काळे यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

एमपीसी न्यूज – कॉसमॉस सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या रविवारी (दि.२२ डिसेंबर २०१९) होत असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उत्कर्ष पॅनेल’ भरघोस मतांनी विजयी होईल, असा विश्वास बँकेचे विद्यमान अध्यक्ष व उत्कर्ष पॅनेलचे प्रणेते सीए मिलिंद काळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत काळे म्हणाले की, उत्कर्ष पॅनल सक्षम, अनुभवी व उच्चशिक्षित उमेदवाराचे परिपूर्ण पॅनेल असल्याने बँकेला आणखी सुस्थितीत नेण्यासाठी भागधारक, खातेदार व हितचिंतक यांचा वाढता प्रतिसाद लाभत आहे. गेली 4 वर्षे मी बँकेचा अध्यक्ष या नात्याने नेतृत्व केले.

या माझ्या कारकिर्दीत बँकने अनेक चढउतार पाहिले. बँकेचे वाढलेले एनपीए, सिक्युरिटी मार्केट लॉस व सायबर हल्ला अशा विविध कठीण प्रसंगातून बँकेला बाहेर काढण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याने बँक आता स्थिरावलेली आहे. ४ वर्षापूर्वी रिझ् र्व बँकेने लादलेली एसएएफ बंधने नुकतीच उठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

कॉसमॉस बँक आता भरारी घेण्याच्या टप्प्यावर असून पुढील काळामध्ये अतिशय सक्षम, सुविद्य, विविध क्षेत्रात कामाचा ठसा उमटविणाऱ्या काही नव्या सहकाऱ्यांना, जे पुढील काळामध्ये बँकेचा धुरा सांभाळतील ,अशांना घेऊन आपण वाटचाल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पॅनलमधील ज्येष्ठ संचालक व कॉसमॉस समूहाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद अभ्यंकर यांनी रिझर्व्ह बँकेच्या विविध समित्यांवर सल्लागाराचे काम केले असल्यामुळे त्यांचे मार्गदर्शन पॅनलला लाभत आहे. बँकेचे तांत्रिक सक्षमीकरण, विकास व विस्तार, ग्राहक सेवेतील गुणात्मक बदल यामुळे आगामी काळात बदलत्या बँकिंग व्यवसायात कॉसमॉस बँकेला अग्रेसर ठेवणे हे उत्कर्ष पॅनेलचे एकमेव उद्दिष्ट असल्याचे काळे यांनी नमूद केले.

बँकेचा म्हणजेच भागधारक, ग्राहक तसेच सेवकवर्ग अशा सर्व स्टेक होल्डरच्या सर्वागीण उत्कर्षासाठी ‘ रोल रोलर ‘चिन्ह असलेल्या उत्कर्ष पॅनल हाच सर्वांत योग्य पर्याय आहे असे ते म्हणाले.

पॅनेलमधील अन्य सदस्यांबद्दल बोलताना ते म्हणाले की ,उत्कृष्ट आर्थिक संस्थांमध्ये अत्यंत आवश्यक असणारा अनुभवी, सीए व तज्ञ जाणकारांची निवड जाणिवपूर्वक या पॅनेलमध्ये केली आहे. सहकार क्षेत्र प्रतिकूल परिस्थितीतून जात असताना दूरदृष्टी व क्षमता असणाऱ्या संचालक मंडळाने एकदिलाने व एक दिशेने काम करणे आवश्यक असल्याने सर्व 13 उमेदवारांची मतदारांनी निवड करावी असे आवाहन काळे यांनी केले.

अन्य पॅनेलच्या तुलनेत उत्कर्षचे पॅनल संख्यात्मकपेक्षा गुणात्मक बाबींवर आघाडीवर असल्याने खातेदार, भागधारक यांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता उत्कर्ष पॅनेलच्या मागे खंबीरपणे उभे राहणे, ही आपल्या कॉसमॉसच्या 114 वर्षाच्या परंपरेची जपणूक करण्याची जबाबदारी सर्व सुज्ञ सभासदावर आहे व ते ती सहज पेलतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेला डॉ. मुकुंद अभ्यंकर, नंदकुमार काकिर्डे, यशवंत कासार, सचिन आपटे, अनुराधा गडाळे, अजित गिजरे, राजाराम धोत्रे, अरविंद तावरे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.