Pune : वंचित आघाडी 288 जागा लढणार ! – डॉ. प्रकाश आंबेडकर

एमपीसी न्यूज- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी सर्वच्या सर्व 288 जागा लढवणार असल्याची घोषणा ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात केली. दरम्यान जागा वाटपासंदर्भात एमआयएम बरोबर बोलणी सुरु असल्याचे देखील ते म्हणाले. पुण्यात आज, सोमवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आगामी विधानसभा निवडणुकीत आमची आघाडी 288 जागा लढणार असून येत्या दोन ते तीन दिवसात उमेदवार जाहीर करणार असल्याचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. काँग्रेस – राष्ट्रवादी सोबत जाणार का या प्रश्नावर त्यांनी आम्ही राज्यातील सर्व जागा लढणार असल्याचे निक्षून सांगितले.

यावेळी बोलताना ऍड. आंबेडकर म्हणाले की, सध्या भारतात विजेचा तुटवडा नाही. राष्ट्रीय आयोगाच्या अहवालानुसार अगदी पिक लोडला पुरेल एवढा वीजपुरवठा आता होत आहे. त्यामुळे ज्या पाण्याचा उपयोग वीज निर्मितीव्यतिरिक्त फारशा प्रमाणावर पिण्यासाठी किंवा शेतीसाठी होत नाही, ते पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरणे हे सार्वजनिक हिताचे आहे. टाटाच्या सहा धरणांतून वीज निर्माण करण्याऐवजी ते पाणी पिण्यासाठी, शेतीला वापरावे अशी मागणी ऍड. आंबेडकर यांनी केली.

पाण्याऐवजी कोळसा, पवनऊर्जा, अणुऊर्जा, सौरऊर्जा असे अनेक स्रोत विजेसाठी उपलब्ध आहे. वंचित आघाडीची सत्ता आल्यानंतर टप्याटप्याने याची अमलबजावणी करणार असल्याचे आंबेडकर म्हणाले. त्याचबरोबर पाण्याचे समन्यायी वाटप, म्हणजे कोरडवाहू पिकांसाठी संरक्षण देणाऱ्या पाणी वाटपाला आणि पिकांसाठी पाणी पुरवण्याला आमचे प्राधान्य राहील असे ऍड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.