Pune : कात्रज बायोगॅस प्रकल्पात घोटाळा -वसंत मोरे यांचा आरोप

एमपीसी न्यूज – कात्रज बायोगॅस प्रकल्पात घोटाळा होत असल्याचा आरोप मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला. यावेळी नगरसेवक साईनाथ बाबर उपस्थित होते.

यावेळी वसंत मोरे म्हणाले, या प्रकल्पाची पाहणी केली असता, जागेवर साधारण एक टन कचरा पडलेला होता. ज्या गाडीने या बायोगॅसवर कचरा टाकला ती गाडी कात्रज कचरा रॅम्पवरून इकडे आली होती. त्या ठिकाणच्या कचरा मुकादामाकडे चौकशी केली असता, त्या गाडीने कात्रज बायोगॅसला सुमारे 3 टन 740 किलो कचरा टाकल्याची नोंद आहे. जागेवर केवळ एकटनच आला होता. कात्रज रॅम्पवरील वजन काट्यावर सायंकाळी 6 नंतर साधारण 14 गाड्या वजन करून गेल्याची नोंद आहे. त्यांना कुठलीही पावती देण्यात आली नाही. कचरा गाडीचा ड्रायव्हर सांगेल ते वजन धरण्यात आले आहे.

विशेष बाब म्हणजे या कचरा रॅम्पवर 5 वार्ड ऑफिसचा कचरा या रॅम्पवर जमा केला जात असताना वजन काट्यावर रात्री 6 नंतर एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचे मोरे यांनी सांगितले. ही बाब अतिशय गंभीर आहे.

कात्रज बायोगॅसवर आलेल्या मागील 54 दिवसांच्या कचऱ्याचा आढावा घेतला असता, दररोज साधारण 6 टन कचऱ्यावर प्रक्रिया केल्याचे कागदोपत्री दिसून येते. हे सर्व अतिशय शंकास्पद आहे. 54 दिवसांत 3 लाख 24 हजार किलो कचऱ्यावर प्रक्रिया झाल्याचे दिसत आहे. एका दिवसात एका गाडीतील कचऱ्यात प्रथम दर्शनी साधारण 3 टन कचऱ्याचा घोटाळा दिसून येत असल्याचे वसंत मोरे यांनी निक्षून सांगितले. हे सर्व प्रकरण अतिशय संशयास्पद आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झाला आहे. 1 प्रकल्पावर एवढा मोठा घोटाळा होत असेल तर, पुणे शहरातील मोठ्या मोठ्या प्रकल्पांचे काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

कात्रज बायोगॅस प्रकल्पासहित या परिसरातून येणाऱ्या सर्व बायोगॅस प्रकल्पांच्या बिलांची फेरतपासणी करून छोट्या-मोठ्या ड्रायव्हर, मुकादम, वाचमन, सुपरवायझर यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा संबंधित बिले ज्या अधिकाऱ्यांच्या सहीने पास केली जातात. जो ठेकेदार याचा आर्थिक लाभार्थी ठरतो. त्या सर्वांवर महापालिकेची आर्थिक फसवणूक केली म्हणून दरोड्याचे गुन्हे दाखल करण्याची मागणी वसंत मोरे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.