Pune : शहरात सायंकाळी सहानंतर ‘वाहनबंदी’

एमपीसी न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार पुणेकरांनी जनता कर्फ्युचे काकडकडीत पालन केले. तर कोरोनाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३१ मार्चपर्यंत राज्यात जमावबंदीचा आदेश दिला. मात्र, कालच्या (रविवारी) कडकडीत बंदनंतर आज ( सोमवारी) सकाळपासून अतिउत्साही पुणेकरांनी रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात गर्दी केल्याने पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी याची गंभीर दाखल घेत आधी दुपारी तीन व त्यानंतर सायंकाळी सहानंतर पुणे शहरात वाहनबंदी लागू केली. यामधून अत्यावशक्य सेवा पुरविणाऱ्या वाहनांना वगळण्यात आले आहे.

राज्य शासनाने जमावबंदी लागू केलेली असताना आज ( सोमवारी) सकाळपासूनच पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येण्यास गर्दी केली. पुण्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व खासगी कार्यालये बंद आहेत. मात्र तरीही, पुणेकर मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने अखेर पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी सायंकाळी सहानंतर वाहनबंदीचा निर्णय घेतला. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासही पोलिसांनी सुरुवात केली.

पोलिसांकडून वाहनचालकांचे प्रबोधन

दुपारपासूनच पोलिसांनी पुण्यात वाहचालकांना अडवून वाहने रस्त्यावर आणू नये याबाबत समज देण्यास सुरुवात केली. शहराच्या विविध भागात पोलिसांनी दुचाकीसह अन्य वाहने अडवून त्यांचे प्रबोधन केले. काही ठिकाणी पोलिसांनी ध्वनीक्षेपकावरून वाहनचालकांची जनजागृती करीत वाहने रस्त्यावर आणू नये, घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले. त्याचवेळी कारवाई करण्याचा इशाराही दिला.

दरम्यान, पोलिसांनी कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर हळूहळू पुण्यातील रस्त्यावरील वाहने गायब झाली. तसेच पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेड लावले. त्यामुळे विनाकारण रस्त्यावरून वाहने दामटविणाऱ्यांची कोंडी केली. परिणामी रस्त्यावरील वाहनांच्या संख्येत कमालीची घट होऊन पुण्यात संचारबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली.

_MPC_DIR_MPU_II

पीएमपीची बससेवा बंद

पुणे शहरात पीएमपीच्या बसेस रस्त्यावर धावू लागल्याने नागरिकही घराबाहेर पडू लागले. त्यामुळे साहजिकच शहरातील रस्त्यांवर नागरिक मोठ्याप्रमाणात दिसू लागले. त्यामुळे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी थेट पीएमपीचे मुख्यालय गाठून पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांनी भेट घेत त्यांना तात्काळ पीएमपीची बससेवा बंद करण्याची मागणी कलेची. त्यानुसार नयना गुंडे यांनीही तात्काळ बससेवा बंद करण्याचे आदेश दिले. दरम्यान, अत्यावश्यक सेवांसाठी बससेवा सुरु राहणार आहे.

‘डीमार्ट’मध्ये एकावेळी पाच ग्राहकांनाच प्रवेश 

जनता कर्फ्यूनंतर दुसऱ्याच दिवशी नागरिकांनी शहरातील  मॉलमध्ये किराणा खरेदीसाठी गर्दी केली. त्यामुळे डीमार्ट प्रशासनाने या गर्दीला आळा घालण्यासाठी ग्राहकांवर निर्बंध लागू केले. त्यानुसार ग्राहकांनी  कूपन घेणे  व एकावेळी केवळ पाचच ग्राहकांना आतमध्ये प्रवेश देण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर सॅनिटायझरचा वापर करुन आणि शरीराचे तापमान तपासूनच मॉलमध्ये प्रवेश देण्यास सुरुवात करण्यात  आली आहे.

पुण्यात राज्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला. त्यानंतर ती संख्या वाढतच आहे. कोरोनाबाधित आणखी एक रुग्ण आढळून आल्याने पुणे शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 16 पर्यंत वाढली आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत पिंपरी-चिंचवडमध्ये एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही, ही पिंपरी-चिंचवडकरांसाठी थोडा दिलासा देणारी बाब म्हणावी लागेल.

पुण्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्येही वेळोवेळी कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत पिंपरी-चिंचवडने पुण्याला मागे टाकले होते. काही दिवस राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीत पिंपरी-चिंचवड प्रथम क्रमांकावर होते. मात्र गेल्या दोन दिवसांत पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन एकही कोरोनाबाधिताची भर न पडल्याने आकडा 12 वर स्थिरावलेला आहे. या सर्व रुग्णांवर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.