Pune : शासन मदतीच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक

कोरोना संदर्भात राज्य शासनाला उशिरा जाग आल्याची टीकाही धीरज घाटे यांनी केली. : Verbal clash between the ruling party and the opposition over the issue of government assistance

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले असताना राज्य शासन काहीच मदत करीत नाही, असे भाजपच्या नगरसेवकांनी म्हणताच विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी जोरदार आक्षेप घेतला.

महापालिकेच्या आज, मंगळवारी झालेल्या ऑनलाइन सभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नगरसेवकांत जोरदार शाब्दिक चकमक उडाली.

पुणे महापालिकेतर्फे कोरोना आटोक्यात आणण्यासाठी 300 कोटी रुपये खर्च केले तर राज्य शासनाने केवळ 3 कोटी रुपये मदत केल्याचे सभागृह नेते धीरज घाटे यांनी सांगितले. कोरोना संदर्भात राज्य शासनाला उशिरा जाग आल्याची टीकाही धीरज घाटे यांनी केली.

तर, ‘तुम्ही सत्ताधाऱ्यांनी झोपा काढल्याचे प्रत्युत्तर नगरसेवक योगेश ससाणे यांनी दिले. तुम्ही सत्ताधाऱ्यांनी आणि राज्य शासनाने कोरोनाच्या काळात काय काम केले, यावर चर्चा होऊनच जाऊ द्या, असे आव्हान शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी दिले.

यादरम्यान सभागृहात गोंधळ सुरू असताना महापौर मुरलीधर मोहोळ नगरसेवकांना वारंवार खाली बसण्याचे आवाहन करीत होते. राज्य शासनावर टीका केल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौरांसमोर येऊन आपले म्हणणे मांडले.

‘भाजपच्या नगरसेवकांनाही समजून सांगा’, असे यावेळी सांगताच ‘आम्ही शांत होतो’, असे उत्तर नगरसेविका वर्षा तापकीर यांनी दिले.

तर, राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेच्या स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेला सर्व अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. आज सर्व अधिकारी उपस्थित आहेत का? हे अधिकारी शासनापेक्षा मोठे झाले का? असा संतप्त सवाल नगरसेवक विशाल तांबे यांनी उपस्थित केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.