Pune : धर्मनिपेक्षता हे सर्वांना जोडणारे सूत्र टिकवून ठेवा- विभूति नारायण राय

गांधी सप्ताह निमित्त आयोजित "सांप्रदायिकता :एक चुनौती" व्याख्यानास प्रतिसाद

एमपीसी न्यूज- धर्मनिरपेक्षता हे सूत्र आपल्याला भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात एकत्र ठेवू शकते. म्हणून हे सूत्र जपले पाहिजे. संविधान हे या सूत्राची संरक्षक ढाल असून त्याची क्षमता कमी होऊ देता कामा नये, असे उद्गार उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक, विभूति नारायण राय
यांनी काढले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित गांधी सप्ताहात ३ ऑक्टोबर झालेल्या ” सांप्रदायिकता :एक चुनौती” व्याख्यानात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीडॉ.कुमार सप्तर्षी होते. जांबुवंत मनोहर, डॉ. उर्मिला सप्तर्षी, समीर गांधी, सचिन चव्हाण, कमलाकर शेटे, सचिन पांडुळे उपस्थित होते.

विभूति नारायण राय म्हणाले,”मौलाना आझाद देखील समजत होते की संविधान आहे, तोपर्यंत मुस्लिमांना धोका नाही. मात्र, आता या संरक्षक ढालीची क्षमता कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मनुस्मृतीचा आग्रह धरणारा वर्ग भारतात असला तरी मनुस्मृती प्रत्यक्षात लागू झाली असती , तर भारताचे अजून तुकडे झाले असते. धर्माच्या आधारे राष्ट्र उभे राहू शकत नाही. आजही भाषेच्या नावाखाली धर्मनिरपेक्ष भारतात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न होता. सर्व राज्यातील भाषा, वेश, खाण्यापिण्याच्या सवयी ही विविधता जपण्याची सोय संविधानात आहे. या विविधतेचा सन्मान करण्याची शिकवण धर्मनिरपेक्ष वादाने आपल्याला दिली आहे. काश्मीरच्या बाबतीत आपण अजूनही लोकशिक्षण केलेले नाही. काश्मीरच्या जनतेला दाराआड बंद करून चालणार नाही. हा देश आपला आहे, हा विश्वास काश्मीरींना देण्याची गरज आहे”

धर्मनिरपेक्षता हे सूत्र आपल्याला एकत्र ठेवू शकते. म्हणून हे सूत्र जपले पाहिजे. इतिहास आणि जुन्या घटना दुधारी तलवारी सारख्या असतात, त्यातून नेमका बोध घ्यावा लागतो, मात्र, इतिहासातील सांगाडे काढण्यात अनेकांना रस आहे. ज्यांना समान नागरी कायदा हवा आहे, त्यांनी किमान त्याचे काही मुद्दे तरी चर्चे खातर समोर ठेवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

अन्वर राजन यांनी प्रास्ताविक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.