Pune : विजय शिवतारे यांचा पराभव झाल्याने पुरंदर विमानतळाचे काय होणार ?

एमपीसी न्यूज -शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारे यांचा पराभव झाल्यामुळे पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाचे आता काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवतारे यांनी हे विमानतळ आणण्यासाठी जोरदार पाठपुरावा केला होता.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी शिवतारे यांचा पराभव केला. पुरंदर तालुक्यातील जनतेचा या विमानतळ उभारणीला विरोध आहे. त्यामुळेच त्यांनी जगताप यांना साथ दिल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी खेड तालुक्यात हे विमानतळ होणार होते. त्याला शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कडाडून विरोध केला होता. त्यानंतर हे विमानतळ पुरंदरला हलविण्यात आले. आढळराव यांचाही लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी पराभव केला होता. विमानतळ पुरंदरला हलविल्याने आढळराव यांना फटका बसल्याचे बोलले जात आहे.

या विमानतळासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लक्ष घातले होते. काँगेस – राष्ट्रवादी – शिवसेनेचे सरकार आले तर या विमानतळाचे काय होणार? शेतकऱ्यांची कशी समजूत घालणार ? का विमानतळ दुसरीकडे हलविणार ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.