Pune : पुण्यात उद्या मतदान, गिरीश बापट विरुध्द मोहन जोशी लढत

एमपीसी न्यूज – देशभरात यंदा लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होत आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात उद्या, मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत महायुतीकडून पालकमंत्री गिरीश बापट आणि आघाडीकडून मोहन जोशी या दोघांमध्ये प्रमुख लढत पाहायला मिळणार आहे. या दोघांमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रविवारी (दि. २१) संध्याकाळी या मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस सज्ज झाले आहेत. 
पुण्यातील जागेसाठी महायुतीकडून मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यात आला. गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावत विरोधकांवर एकच हल्ला चढविला. यंदा पुन्हा देशाची सत्ता भाजपच्या हाती यावी. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष अमित शाह यांनी देशातील प्रत्येक मतदारसंघात जाऊन रॅली आणि प्रचार सभा घेऊन आगामी पाच वर्षात कोणती कामे केली जाणार आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

  • आघाडीकडून उमेदवार घोषित करण्यास थोडासा उशीर झाला. पण मोहन जोशी यांनी प्रचारात काही प्रमाणात आघाडी घेतल्याचे पाहावयास मिळाले. मोहन जोशी यांच्या प्रचारासाठी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्यसभा खासदार आनंद शर्मा, प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावत सत्ताधारी पक्षाच्या कारभाराचा भांडाफोड केला.
मागील पंधरा दिवसापासुन एकमेकांवर आरोप करणारे गिरीश बापट आणि मोहन जोशी यांचे भवितव्य उद्या मतपेटीमध्ये बंदिस्त होणार आहे. या निवडणुकीकडे संबध देशाचे लक्ष लागून राहिले आहे. कारण याच मतदारसंघातून 2014 च्या निवडणुकीत भाजपचे अनिल शिरोळे हे सर्वाधिक मताधिक्य घेऊन संसदेत गेले होते. यंदा शिरोळे यांना तिकीट मिळाले नाही.  मात्र नाराज न होता पक्षाचा अंतिम आदेश मानत निवडणूकीच्या प्रचार सक्रिय सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.