Pune : धरण क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा

Waiting for heavy rains in the dam area

एमपीसी न्यूज – जून महिन्यात सुरुवातीच्या काही दिवसांत हजेरी लावणाऱ्या पावसाने आता ओढ दिली आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून रोज कडक ऊन आणि सायंकाळी आकाशात ढग दाटून येतात. पण, पाऊस काही पडत नाही. त्यामुळे पुणेकरांना आता धरण क्षेत्रात दमदार पावसाची गरज आहे.

पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे खडकवासला धरणे 100 टक्के भरली की पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली.

मात्र, सध्या पुणे शहरावर पाऊस रुसला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्धा जून महिना संपत आला आहे. मान्सून आल्याचे सांगण्यात येते, पण पाऊस काही होत नाही.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत केवळ 6 टीएमसी पाणीसाठा आहे. ही धरणे भरण्यासाठी आणखी 23 टीएमसी पाणीसाठा आवश्यक आहे. सध्या टेमघर धरण रिकामे आहे.

खडकवासला धरणात 1.13 टीएमसी, वरसगाव 2.31, तर पानशेत धरणात 2.60, असा एकूण 6 टीएमसी पाणीसाठा आहे.

यावर्षी लवकर आणि चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे व्यक्त करण्यात आला. मात्र, सध्या पाऊस गायबच झाला आहे. दरवर्षी जुलै आणि आगस्ट महिन्यांतच धरण क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्याचे सांगण्यात येते.

मागील दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात कडक ऊन पडत आहे. सायंकाळी काही प्रमाणात पावसाची भुरभुर येते. थोडाफार गारवा निर्माण झाल्यानंतर रात्री आणखी उकाडा जाणवतो. या चारही धरणांची एकूण क्षमता 29.15 टीएमसी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.