Pune : ‘सौरऊर्जा प्रकल्पा’वरुन आबा बागुल – सुभाष जगताप यांच्यात जुंपली; आयुक्तांच्या हस्तक्षेपाने वादावर पडदा

war in Aba Bagul and Subhash Jagtap from 'Solar Energy Project'; Dispute over the Commissioner's intervention :'सौरऊर्जा प्रकल्पा'वरुन आबा बागुल - सुभाष जगताप यांच्यात जुंपली; आयुक्तांच्या हस्तक्षेपाने वादावर पडदा

एमपीसी न्यूज – तळजाई टेकडीवर करण्यात येणाऱ्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या कामांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीतच काँग्रेसचे नवनियुक्त गटनेते आबा बागुल आणि राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप यांच्यात चांगलीच जुंपली. दोघांनीही एकमेकांची उनीदुनी काढत ढोंगी, सोंगी, असे शब्दोच्चार काढले. दोन्ही जेष्ठ नगरसेवक आपापसात भांडत असल्याने महापालिका अधिकाऱ्यांनाही धक्काच बसला.

हमरीतुमरीवर हे प्रकरण गेले होते. त्यामुळे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी तातडीने हस्तक्षेप करून दोघांनाही शांत केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कामासाठी आमदार, सर्व नगरसेवक यांची बैठक घेण्याची सूचना केली होती. बागुल यांनी हा प्रकल्प कसा आवश्यक आहे, ते स्पष्ट केले. त्याला जगताप यांनी जोरदार हरकत घेतली. तांत्रिकदृष्ट्या हा प्रकल्प योग्य नाही. हिलटॉप, हिलस्लोप आणि पार्क संदर्भात निर्णय शासनाकडे प्रलंबित असल्याचे सांगितले.

प्लॉटधारकांनी महापालिकेविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या व नुकत्याच महापालिकेच्या बाजूने लागलेल्या निकालाचा संदर्भही दिला. असे एकमेकांचे मुद्दे खोडले जात असताना आम्ही लोकांनी निवडून दिलेले नगरसेवक आहोत, स्वीकृत नाही, अशी टीका बागुल यांनी केली.

त्यामुळे जगताप यांनीही मग बागुल यांचे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या 15 प्रकल्पांपैकी 13 प्रकल्प बंद असल्याचे सांगितले.

त्यावरून दोघांनीही एकमेकांना अपशब्द वापरले. नंतर हे प्रकरण वाढत असल्याने आयुक्तांनी दोघांनाही शांत केले.

दरम्यान, या दोघांचाही वाद 2017 च्या पुणे महापालिका निवडणुकीपासून जगजाहीर आहे. त्यानंतर जगताप आणि बागुल यांच्यात कायमच वादविवाद होत असल्याचे दिसून येते. पुणे महापालिकेच्या सभागृहातही या दोघांचा वाद चांगलाच गाजला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.