Pune : डॉक्टर असल्याचे सांगत ‘वॉर्डबॉय’ने केले गर्भवती महिलेवर उपचार; बाळाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- डॉक्टर असल्याचे सांगून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या गर्भवती महिलेवर वॉर्डबॉयने उपचार केले. परंतु, महिलेला जास्त रक्तस्राव झाल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकारात बाळाला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे त्याची प्रकृती नाजूक झाली. तीन दिवसांच्या उपचारानंतर बाळाचा मृत्यू झाला. वडगाव शेरी परिसरातील अनुप हॉस्पिटल मध्ये हा प्रकार घडला. जून महिन्यात ही घटना घडली असून धक्क्यातून सावरल्यानंतर या प्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणी वडगाव शेरी येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार हरी शंकर ठाकूर (वय 36, रा. वडगाव शेरी) आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार एका खासगी कंपनीत नोकरी करतात. त्यांची पत्नी आठ महिन्यांची गर्भवती होती. 9 जून रोजी रात्री अचानक त्यांच्या पत्नीच्या पोटात दुखत असल्याने त्यांनी वडगाव शेरी येथील अनुप रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी एक व्यक्ती डॉक्टरच्या वेशात होती. त्या व्यक्तीने आपण डॉक्टर असल्याचे सांगून महिलेचा रक्तदाब तपासला असता तो वाढल्याचे दिसले. त्या वेळी त्याने मोबाइलवरून कोणाला तरी फोनवर ही माहिती दिली. त्यानंतर मिळालेल्या सूचनांनुसार त्याने महिलेला तपासले.

त्या वेळी पत्नीने रक्तस्राव होत असल्याचे सांगितले. तरीदेखील त्याकडे या वॉर्डबॉयने दुर्लक्ष केले. काही वेळाने परत रक्तस्राव होत असल्याची माहिती दिली असता त्याने दोन गोळ्या घेण्यास सांगितले. एक गोळी महिलेने घेतली. मात्र, काही वेळातच मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. त्या वेळी तो डॉक्टर असलेला वॉर्डबॉय घाबरून गेला. त्याने त्यांना तत्काळ या महिलेला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यास सांगितले.

रात्री एकच्या सुमारास तक्रारदार पती आपल्या पत्नीला त्या ठिकाणी घेऊन गेले. यानंतर दुसऱ्या रुग्णालयातील डॉक्टरने बाळाची प्रकृती नाजूक असून त्याला काचेच्या पेटीत ठेवावे लागेल, त्यासाठी जास्त खर्च होऊ शकतो, अशी माहिती दिली. हा खर्च परवडणार नसल्यामुळे पतीने पहाटे तीन वाजता पत्नीला कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. महिलेची परिस्थिती पाहून तेथील डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू केले. मात्र, रक्तस्राव जास्त झाल्याने सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु, बाळाची प्रकृती नाजूक झाली होती. त्यानंतर तीन दिवसांनी बाळाचा मृत्यू झाला. या धक्क्यामधून सावरल्यानंतर संबंधित तक्रारदार पतीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.