Pune : वारजे-माळवाडीत अँटीजन रॅपिड टेस्ट सेंटर सुरू; दररोज 200 टेस्ट होणार

Warje - Antigen Rapid Test Center started in Malwadi; There will be 200 tests per day : या टेस्टमुळे एका तासातच कोरोनाचा रिपोर्ट मिळणार आहे

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वारजे – माळवाडी परिसरात आजपासून अँटीजन रॅपिड टेस्ट सेंटर सुरू करण्यात आले. या ठिकाणी दररोज 200 टेस्ट होणार आहेत.

पुणे महापालिका वारजे -कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक 32 मधील कै. अरविंद बारटक्के हाॅस्पिटलमध्ये वारजे येथे अँटीजन रॅपिड टेस्ट सेंटर सुरू करण्यात आले.

यावेळी पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ, ज्येष्ठ नगरसेवक दिलीप बराटे, नगरसेवक सचिन दोडके, माजी नगरसेवक बाबा धुमाळ, डाॅ. तारडे, ॠतुराज दीक्षित, मनपाचे अधिकारी, नागरिक उपस्थित होते.

या टेस्टमुळे एका तासातच कोरोनाचा रिपोर्ट येणार असल्याने नागरिकांमध्ये या टेस्टबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. यापूर्वी कोरोनाची टेस्ट करण्यासाठी सिंहगड रोड आणि एसएनडीटी कॉलेज येथे जावे लागत होते.

आता वारजे – माळवाडीतील नागरिकांना परिसरातच कोरोना टेस्टची सोय झाली आहे. निगेटिव्ह रिपोर्ट येणाऱ्या नागरिकांना घरी सोडण्यात येणार आहे.

तर, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर पुणे महापालिकेच्या जवळच्याच क्वारंटाईन सेंटरवर उपचार करण्यात येणार आहेत, असे दीपाली धुमाळ यांनी सांगितले.

ही चाचणी मोफत असून केवळ एक तासात रिपोर्ट मिळणार आहे. अधिक माहितीसाठी ॠतुराज दीक्षित (9011873436), सचिन सावंत (9766264005), किरण जाधव (7972840680) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ,  ज्येष्ठ नगरसेवक दिलीप बराटे, नगरसेवक सचिन दोडके, माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांनी केले आहे.

शहराच्या इतर ठिकाणी अशा प्रकारचे सेंटर सुरू झाले आहेत. वारजे – माळवाडी परिसरात हे सेंटर सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्याला अखेर यश आले, अशी माहिती दीपाली धुमाळ यांनी दिली. हे सेंटर सुरु केल्याबद्दल माजी नगरसेवक किरण बारटक्के यांनी अभिनंदन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.