Pune: पुणे शहरावर पाणीकपतीचे संकट; महापौरांनी बोलावली मंगळवारी बैठक

एमपीसी न्यूज – यंदा कधी नव्हे ती पावसाने ओढ दिल्याने पुणेकरांवर पाणीकपतीचे संकट आणखी गडद झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर धरणांतील उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्या संदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उद्या (मंगळवारी) बैठक बोलावली आहे. महापालिका व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

पुणे शहरात कोरोनाचे अभूतपूर्व असे संकट निर्माण झाले असताना आता पिण्याच्या पाण्याची समस्याही निर्माण होण्याची चिन्हे आहेत. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत सध्या केवळ 9.82 टीएमसी म्हणजेच 33  टक्के पाणीसाठा आहे. जून महिन्यात सुरुवातीला काही दिवस हजेरी लावणाऱ्या पावसाने आता ओढ दिली आहे.

जुलै महिना संपला. मात्र, पावसाचा काहीही पत्ता नाही. आज येणार, उद्या येणार, चांगला होणार, अशा प्रकारचा अंदाज हवामान खात्यातर्फे देण्यात येत आहे. दरवर्षीचा अनुभव बघता यंदा कधी नव्हे एवढा पाऊस पुण्यातून गायब झाला आहे. त्यामुळे आहे त्या पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.

मागील वर्षी याच कालावधीत धरणांत 20.43 टीएमसी म्हणजेच 70 टक्के पाणीसाठा होता. तब्बल 55 टक्के पाणी कमी आहे. या चारही धरणांची एकूण क्षमता 29.15 टीएमसी आहे.

पुणे महापालिका शहरात 2 वेळ पाणीपुरवठा करीत असल्याने महिन्याला सव्वा ते दीड टीएमसी पाणी उचलते. वर्षाला महापालिकेला 11.50 टीएमसी पनिकोटा मंजूर आहे. प्रत्यक्षात महापालिका वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात तब्बल 18 टीएमसी पाणी उचलते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.