Pune : खडकवासला धरणातून सकाळी 11 वाजता 27 हजार 203 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

एमपीसी न्यूज- पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असून वरसगाव, पानशेत, टेमघर आणि खडकवासला या धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून आज सकाळी 11 वाजता 27 हजार 203 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात येणार आहे.

मुठा नदीमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण होणार असून भिडे पुल पाण्याखाली जाणार आहे. त्यामुळे नदीपात्र मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून परीसरातील नागरीकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान,  खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चार धरण परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावली असून या धरण साखळीमध्ये सरासरी 93.06 टक्के पाणीसाठा झाला आहे.

आज, शनिवारी सकाळी ६ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार, खडकवासला धरण परिसरामध्ये मागील 24 तासात 30 मिमी पाऊस पडला असून आजपर्यंत 759 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये 1.97 टीएमसी इतकी वाढ झाली असून धरण 100 टक्के भरले आहे.

पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागील 24 तासात 92 मिमी पाऊस झाला असून पाणी पातळीमध्ये 10.65 टीएमसीने वाढ झाली आहे. यंदाच्या मोसमात आजपर्यंत 2087 मिमी इतका पाऊस पानशेत धरण परिसरामध्ये झाला असून धरण 100 टक्के भरले आहे.

वरसगाव धरणामध्ये मागील 24 तासात 116 मिमी पावसाची नोंद झाली असून यंदाच्या मोसमामध्ये आजपर्यंत 2078 मिमी पाऊस झाला आहे. धरणाच्या पाणी पातळीमध्ये 11.55 टीएमसी इतकी वाढ झाली असून धरण 90.12 टक्के भरले आहे.

टेमघर धरण पाणलोटक्षेत्रामध्ये मागील 24 तासामध्ये 178 मिमी पाऊस झाला असून यंदाच्या मोसमात आजपर्यंत एकूण 2933 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या पाणी पातळीमध्ये 2.95 टक्के इतकी वाढ झाली असून धरण 79.62 टक्के भरले आहे.

चारही धरणात सरासरी 93.06 टक्के पाणीसाठा निर्माण झाला असून 27.13 टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. मागील वर्षी याच दिवशी चारही धरणे सरासरी 86.91 टक्के भरली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.